पंकजा मुंडे यांना तब्बल साडेचार वर्षांनंतर संधी… फडणवीस यांचे टेन्शन गेले!

  • Written By: Published:
पंकजा मुंडे यांना तब्बल साडेचार वर्षांनंतर संधी… फडणवीस यांचे टेन्शन गेले!

मुंबई : Lok Sabha Election 2024 भारतीय जनता पक्षाने (BJP) बीडमधून आज पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून त्यांना कोणत्याच पदावर संधी देण्याचे भाजपने टाळले होते. पण आता लोकसभेची उमेदवारी देऊन त्यांचे पुनर्वसन पक्षाने केले आहे. पण त्यासाठी त्यांच्या भगिनी प्रीतम यांच्या राजकीय प्रवासाला विराम लागण्याची शक्यता आहे.

पंकजा या लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी सुरवातीला तयार नव्हत्या. बहिणीच्या राजकीय प्रवासात आपण अडसर बनणार नाही. त्याऐवजी दुसरा विधानसभा मतदारसंघ शोधू, असेही त्यांनी सांगितले होते. संपूर्ण महाराष्ट्र हा माझा मतदारसंघ आहे, असे त्या सांगत होत्या. पण पंकजा यांनी बीडमधूनच लोकसभा लढवावी, असा पक्षाचा आदेश त्या मोडू शकल्या नाहीत. पंकजा यांना चार वर्षे संधी मिळत नसल्याने त्याचा सारा रोष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर येत होता. आता मात्र त्यांचे राजकीय पुनर्वसन झाल्याने फडणवीस यांचेही टेन्शन गेले आहे. पंकजा यांना संधी न देण्याचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवरून घेतला जात होता. मात्र त्याचे सारे खापर फडणवीस यांच्यावर फोडले जात होते. त्यातून या दोन नेत्यांतील समर्थकांत नेहमीच संघर्ष पाहावयास मिळत होता.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारलेल्या विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांचे राजकीय पुनर्वसन भाजपने केले. अशोक चव्हाण या काॅंग्रेसमधून आलेल्या नेत्याला तातडीने राज्यसभेचे खासदार केले. पंकजा यांच्याप्रमाणे २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव झालेले राम शिंदे हे विधान परिषदेचे आमदार झाले. पण पंकजा यांना डावलले जात होते. त्यातून पंकजा यांनीही अनेकदा जाहीर नाराजी व्यक्त केली होती. ही नाराजी त्या सूचकपणे व्यक्त करत होत्या. त्यातून पक्षही त्यांच्यावर नाराज होत होता. आता मात्र ही कटुता दूर होण्याची शक्यता आहे. आपल्याला लोकसभेची उमेदवारी मिळणार, याचे संकेत त्यांना या आधीच मिळाले होते. तशी विधानेही त्यांनी केली होती.

बीडमध्ये २००९ पासून मुंडे कुटुंबातीलच खासदार आहे. गोपीनाथ मुंडे हे २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीतून येथून निवडून गेले होते. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कन्या प्रीतम या खासदार झाल्या. २०१९ मध्ये पुन्हा त्यांना संधी मिळाली. आता २०२४ मध्ये पंकजा या भाजपच्या उमेदवार असतील. भाजपसोबतच्या महायुतीत राष्ट्रवादी काॅंग्रेस असल्याचा मोठा फायदा पंकजा यांना बीडमध्ये होणार आहे. पंकजा यांचे राजकीय स्पर्धक मानले जाणारे धनंजय मुंडे हेच त्यांचा प्रचार करणार आहेत. संपूर्ण मुंडे कुटुंब २००९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच राजकीयदृष्ट्या एकत्र आल्याचे या निमित्ताने दिसणार आहे.

मोदी-शाहांकडून अनेक दिग्गजांना धक्का; शेट्टी, कोटक, प्रीतम मुंडेंचा पत्ता कट

पंकजा यांच्यासह सुधीर मुनगंटिवार हे दुसरे दिग्गज नेते आता भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात उतरवले आहेत. मुनगंटिवार यांना आपले राज्यातील मंत्रीपद सोडून दिल्लीत जाण्याची इच्छा नव्हती. आपले लोकसभेचे तिकिट कापले जावे, यासाठी ते स्वतः प्रयत्नशील होते. पण अखेरीस त्यांनाही पक्षाचा आदेश मानावा लागला. राज्य मंत्रीमंडळातील इतर नेत्यांचीही नावे लोकसभेसाठी चर्चेत होती. पण त्यात फक्त मुनगंटिवार यांचा क्रमांक लागला.

भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे

१) चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
२) रावेर – रक्षा खडसे
३) जालना- रावसाहेब दानवे
४) बीड पंकजा मुंडे
५) पुणे- मुरलीधर मोहोळ
६) सांगली – संजयकाका पाटील
७) माढा- रणजीत निंबाळकर
८) धुळे – सुभाष भामरे
९) उत्तर मुंबई- पियुष गोयल
१०)  उत्तर पूर्व- मिहीर कोटेचा
११) नांदेड- प्रतापराव चिखलीकर
१२) अहमदनगर- सुजय विखे पाटील
१३) लातूर- सुधाकर श्रृंगारे
१४) जळगाव –  स्मिता वाघ
१५) दिंडोरी- भारती पवार
१६)  भिवंडी- कपिल पाटील
१७) वर्धा – रामदास तडस
१८)  नागपूर – नितीन गडकरी
१९) अकोला – अनुप धोत्रे
२०) नंदुरबार- डॉ. हिना गावित

 

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube