आघाडी धर्म पाळणार! टोपे म्हणाले, नवरदेव शिवसेनेचा अन् वऱ्हाडी राष्ट्रवादीचे
Parbhani Lok Sabha : आज देशात काय परिस्थिती आहे हे आपण पाहत आहोत. आता या देशाला हुकुमशाही नकोय असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री राजेश टोपे (Parbhani Lok Sabha) यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. (Bandu jadhav) ते परभणीत महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) प्रचारसभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शरद पवार, उमेदवार बंडू जाधव, आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.
शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच
गेल्या काही दिवसांत भाजपकडून पक्ष फोडण्याचा नाही, तर पक्ष पळवण्याचा कारभार सुरू आहे. मात्र, शेंबड्या पोराला विचारलं तरी ते सांगेल की शिवसेना कुणाची आहे असं म्हणत खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे. तसंच, आम्ही साक्षिदार आहोत राष्ट्रवादी कुणाची तर ती शरद पवारांची आहे असं म्हणत राजेश टोपे यांनी विरोधाकांवर जोरदार टीका केली.
हा माणूस आपल्या घरातील
आमचा आणि शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांचा जास्त संबंध नव्हता. परंतु, महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरेंना जवळून अनुभवन्याचा योग आला. तु्म्हाला दाव्याने सांगतो, हा माणूस अत्यंत संवेदनशील, मोठ्या मनाचा आहे अशा शब्दांत टोपे यांनी यावेळी उद्ध ठाकरेंची स्तुती केली. तसंच, त्यांच्याबाबत कोरोना काळात सर्वांनाच वाटत होते हा माणूस आपल्या घरातील आहे असंही टोपे यावेळी म्हणाले.
नवरदेव शिवसेनेचा
गेल्यावर्षी जे शेतकऱ्यांच नुकसान झालं त्याचंहीअनुदान शेतकऱ्यांना मिळालं नाही. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी गॅरंटी देतात. परंतु, तरुणांना रोजगार दिला नाही, तर सरळ सरळ फसवणूक केली आहे असा घणाघात टोपे यांनी यावेळी केला. तसंच, उपस्थितांना कोणत्याही गोष्टीवरून राग मानू नका. कुणी नमस्कार केला नाही. कुणी बोललं नाही असं म्हणू नका. आता नवरदेव शिवसेनेचा आहे आणि आपण राष्ट्रवादीवाले वऱ्हाडी आहोत. मात्र, आपल्याला आघाडी धर्म पाळायचा असून सर्वांना महाविकास आघाडीला विजयी करायचं आहे असं आवाहनही टोपे यांनी यावेळी केलं.