राज ठाकरेंचा शिलेदार अडकणार? शिंदे अन् ठाकरेंची तगडी फिल्डिंग…
खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) विरुद्ध आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील (Raju Patil). मागील दहा वर्षांमध्ये या दोघांमधील राजकीय कुस्ती मतदारांनी अत्यंत जवळून पाहिली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून सुरु झालेला हा संघर्ष नंतरच्या काळात प्रचंड टोकाचा झाला. राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्यात थोडंही जमलं नाही. अगदी माज उतरविण्यापर्यंतची भाषा राजू पाटील यांनी श्रीकांत शिंदे यांच्यासाठी केली होती. तर “आजी पुढे माजी लावायला लावू नका”, असा इशारा श्रीकांत शिंदे यांनी राजू पाटील यांना दिला होता.
पण लोकसभेला वरुन आदेश आले आणि राजू पाटलांनी श्रीकांत शिंदेंशी जुळवून घेतले. श्रीकांत शिंदेंना या मतदारसंघातून 80 हजारांचे लीड मिळाले. आता आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे विरुद्ध राजू पाटील यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. पक्षनेतृत्वाच्या पातळीवरील काही समझोता झाला तर चित्र वेगळे असू शकेल. अन्यथा कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेने कोणीही उमेदवार दिला तरी हा वाद श्रीकांत शिंदे विरुद्ध राजू पाटील असाच असणार आहे. आता या वादात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे फावणार का? हा प्रश्न मागे राहतो… (possibility of a fight between Raju Patil, Subhash Bhoir and Rahul Mhatre in Kalyan Assembly Constituency.)
पाहुया ‘ग्राऊंड झिरो’ या आपल्या विशेष सिरीजमधून’ कल्याण ग्रामीण मतदारसंघात काय सुरु आहे?
ठाणे, नवी मुंबई आणि एमएमआरडीए रिजन या भागांशी सलग्न असलेला मतदारसंघ म्हणजे कल्याण ग्रामीण. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन कल्याण ग्रामीण मतदारसंघ निर्माण झाला. ग्रामीण भागात भूमिपूत्र आगरी समाजाचे वर्चस्व जास्त असून त्या खालोखाल उत्तर भारतीयांची संख्या अधिक आहे.
2009 साली मनसेच्या रमेश पाटील यांनी शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांचा पराभव करत विजय मिळविला. त्यावेळी पाटील यांना 51 हजार तर म्हात्रे यांना 41 हजार 642 मते मिळाली होती. त्यानंतर 2014 साली शिवसनेने पराभवाचा वचपा काढत मनसेच्या रमेश पाटलांचा पराभव केला. सुभाष भोईर इथून आमदार झाले. 2019 मध्ये मनसेने पुन्हा कमबॅक केले. रमेश पाटील यांचे बंधू राजू पाटील इथून आमदार झाले. रमेश म्हात्रे यांचा दुसऱ्यांदा पराभव झाला. शिवसेनेने सुभाष भोईर (Subhash Bhoir) यांच्याऐवजी रमेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली होती. यासाठी खासदार शिंदे यांनीच हट्ट केल्याचे त्यावेळी बोलले जात होते.
काँग्रेसचा चाणाक्य महाराष्ट्राच्या मैदानात… विधानसभेला महायुतीची धडधड वाढणार?
आता विधानसभेच्या निमित्ताने हे पक्ष आणि नेते एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. यात मनसेकडून राजू पाटील यांचे नाव निश्चित असल्याचे चित्र आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुभाष भोईर यांची उमेदवारी अंतिम झाली आहे. त्यादृष्टीने भोईर आणि पक्ष कार्यकर्ते कामालाही लागले आहेत. जर पक्षीय पातळीवर समझोता नाही झाला तर मनसेच्या विरोधात एकनाथ शिंदे हेही उमेदवार देण्याची शक्यता आहे. रमेश म्हात्रे यांच्यावरच ते पुन्हा एकदा विश्वास दाखवू शकतात. जर असे झाले तर श्रीकांत शिंदे विरुद्ध राजू पाटील यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.
तसे राजू पाटील हे श्रीकांत शिंदे यांचे कट्टर राजकीय विरोधकच. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी राजू पाटील यांच्या परिवारावर घणाघात करुन प्रचारसभा लढवली होती. त्या निवडणूकीत पाटील यांचा पराभव झाला होता. तेव्हापासून पाटील आणि शिंदे यांच्यातील संबंध ताणले गेले. 2019 ची विधानसभा निवडणूक राजू पाटील यांनी जिंकली, तिथून त्यांनी शिंदे पिता-पुत्राचे उट्टे काढायला सुरुवात केली. शिंदे यांनी आखलेल्या प्रकल्पांबाबत राजू पाटील यांनी अनेकवेळा टीकाटिप्पणी केली. मुख्यमंत्र्यांचा मुलगा जरी आपल्या समोर असला तरी आपण लढायला तयार असतो आणि या मतदारसंघात विरोधकांचा चेहरा आपणच आहोत हे चित्र पाटील यांनी अगदी पद्धतशीरपणे तयार केले.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मात्र एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातील मैत्री घट्ट झाली. लगोलग राज यांनी मोदी यांना पाठिंबा दिला. त्यानंतर पाटील यांनी शिंदे यांच्याशी जुळवून घेतले. ‘राजगडा’वरून संदेश येताच राजू पाटील श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कामालाही लागले. कल्याण लोकसभा निवडणूक मनसेचे लढविण्याचे ठरवले असते तर आमदार राजू पाटील यांचे नाव चर्चे होते, त्यांनी शिंदे यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले असते. पण पाटील यांनी शिंदे यांचे काम केल्याचे चित्र निकालानंतर दिसून आले. श्रीकांत शिंदे यांना इथून 80 हजारांची आघाडी मिळाली.
“निवडून येतील त्यांनाच तिकीट, मनसे नेते सत्तेत बसवायचे”; राज ठाकरेंचा इलेक्शन प्लॅन
आता विधानसभेच्या तोंडावर राज ठाकरे यांनी स्वतंत्र चूल मांडली आहे. त्याचवेळी कल्याण ग्रामीणमध्ये शिंदे गटाचीही मोठी ताकद असल्याचे या नेत्यांचे म्हणणे आहे. 27 गावात आणि परिसरात राजू पाटील यांचे वर्चस्व खासदार शिंदे यांच्या समर्थकांना मान्य नाही. त्यामुळे मगाशी सांगितल्याप्रमाणे, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातील समीकरण जुळले तर चित्र वेगळे असू शकेल. नाही तर कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेने कोणीही उमेदवार दिला तरी हा वाद श्रीकांत शिंदे विरुद्ध राजू पाटील असाच असणार आहे. यात आता ठाकरेंच्या सेनेला कसा स्कोप मिळणार हा प्रश्न कायम आहे.
कल्याण ग्रामीणमधील मनसेचा मतदार हा मुळचा शिवसैनिक आहे. शिंदे यांच्यापेक्षा त्यांना ठाकरे हे कायम जवळचे राहीले आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाचे वर्चस्व ग्रामीण भागात जास्त दिसून येते. त्यामुळे कल्याण ग्रामीण मधील लढत रंगतदार असणार हे नक्की.