“निवडून येतील त्यांनाच तिकीट, मनसे नेते सत्तेत बसवायचे”; राज ठाकरेंचा इलेक्शन प्लॅन

“निवडून येतील त्यांनाच तिकीट, मनसे नेते सत्तेत बसवायचे”; राज ठाकरेंचा इलेक्शन प्लॅन

Raj Thackeray on Elections 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वेगात वाहत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीने मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. तसेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही तिरक्या चाली खेळण्यास सुरुवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाची वाटचाल कशी राहिल याचे संकेत पुन्हा एकदा दिले आहेत. आपण 225 ते 250 जागा लढवणार आहोत. जे निवडून येतील त्यांनाच तिकीट देणार आहोत. तिकीट मिळालं म्हणजे मी पैसे काढायला मोकळा असा समज कुणीही करुन घेऊ नका. आता मनसेचे नेते काहीही करून सत्तेत बसवायचे आहेत. यावर काही जण नक्कीच हसतील पण आता हे घडणार म्हणजे घडणार, असा निर्धार राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

मुंबईतील रंगशारदा सभागृहात मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना राज ठाकरेंनी आगामी निवडणुकीबाबत पक्षाची काय स्ट्रॅटेजी असेल याचाही खुलासा केला. याबरोबरच त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकारणावर खोचक भाष्य केले. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांवर टीकाही केली.

वसंत मोरेंच्या हाती शिवबंधन; बडा नेता हाताशी येताच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना घेरले 

लाडकी बहिण अन् भाऊ एकत्र आले असते तर पक्ष वाचले असते

पाणी, वीज, आरोग्य यांसारख्या मूळ मुद्द्यांकडे लक्ष देण्यास आमच्याकडे वेळ नाही. पण आमच्याकडे काय चालू आहे लाडकी बहिण अन् लाडका भाऊ. अहो लाडकी बहिण आणि लाडका भाऊ एकत्र आले असले तर दोन्ही पक्ष टिकले असते असा खोचक टोला राज ठाकरेंनी लगावला. लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये द्यायला राज्य सरकारकडे पैसे आहेत का. रस्त्यावरील खड्डे बुजवायला यांच्याकडे पैसे नाहीत अशी टीका त्यांनी राज्य सरकारवर केली.

राज्यात अनेक प्रश्न आहेत. याच प्रश्नांवर फोकस करा. आगामी काळात विधानसभा निवडणुकीत या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करा. हेच तुमचं कॅम्पेन असलं पाहिजे. आज राजकारणात एकमेकांना शिव्या द्यायच्या असा प्रकार सुरू आहे. पण यातून काहीच साध्य होणार नाही. मी राज्यातील मतदारसंघांची आणि आमदारांची यादी वाचत होतो तर विचारावं लागायचं की हा आमदार कोणत्या पक्षाचा आहे. अशी परिस्थिती मी राज्यात कधीच पाहिली नव्हती. कोण कुठे गेला कोण कोणत्या पक्षात गेला काहीच कळत नाही. आता येणाऱ्या निवडणुकीत या राजकीय पक्षांत जे घमासान होणार आहे ते न भूतो असं असेल.

मला कुणीतरी सांगितलं की आपल्या पक्षातले एक दोन पदाधिकारी दुसऱ्या पक्षात जायला तयार आहेत. मी म्हटलं त्यांच्यासाठी मी स्वतः रेड कार्पेट घालतो. जा म्हणून. आणि जो भविष्याचा सत्यानाश करुन घ्याल तो घ्यालच. ह्यांचंच स्थिर नाही तुम्हाला कुठं डोक्यावर घेणार. लोकसभेला काय झालं पाहिलंत ना. वर्षापर्यंत घुसले. आता विधानसभेला कुठे कुठे घुसतील माहित नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.

विधानसभेला मनसे 200 ते 215 जागा लढणार, राज ठाकरेंच्या शिलेदाराचं मोठं विधान

follow us
  • fb
  • instagram
  • youtube