‘चव्हाणांच्या राजीनाम्याचा मविआवर विशेष परिणाम…’; प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया
Prakash Ambedkar On Ashok Chavan : गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण (Ashok Chavan) भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अशातच आज चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसचे अनेक नेते एकामागून एक पक्ष सोडत असल्याने काँग्रेसला मोठा फटका बसला. आधी मिलिंद देवरा, नंतर बाबा सिद्दीकी आणि आता आणखी अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळं काँग्रेसला मोठं खिंडार पडलं. दरम्यान, चव्हाण यांच्या राजीनाम्यावर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी प्रतिक्रिया दिली.
‘काँग्रेसची अवस्था पाहून मनाला वेदना’; चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर सत्यजित तांबेंची पोस्ट
आज माध्यमांशी बोलतांना प्रकाश आंबेडकर यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी चव्हाणांच्या राजीमान्यावरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर लोक समाधानी नाहीत. मी महाराष्ट्रात जिथे जिथे गेलो तिथे लोकांची मानसिकता समोर आली आहे. महाराष्ट्रात कधीही एवढे वाद नव्हते. स्थिर सरकार असायचं. निकालाच्या दिवशी बोंबाबोंब व्हायची. पण अंतिम निकाल मान्य व्हायचा आणि पाच वर्षे सरकार चालाययं. पण आता पक्ष फोडणे, गोळीबार करणे, धमक्या देणे हे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. हे मराठी माणसाच्या मानसिकतेला झेपणारं नाही. तो त्यांच्यशी सहमत नाही, त्यामुळं मराठी माणूस निवडणुकीची वाट पाहत असल्याचे दिसून येतंय, असं आंबेडकर म्हणाले.
ते म्हणाले, 15 तारखेला राहुल नार्वेकर राष्ट्रवादीबाबत काय निकाल देणार? यावर सध्या चर्चा सुरू आहे. भाजपला वाटत असेल की, या निकालामुळं ते अधिक सुरक्षित होतील, पण परिस्थिती मला कठीण दिसतेय, असं आंबेडकर म्हणाले.
च्व्हाणांच्या राजीनाम्यामुळं कॉंग्रेस- महाविकास आघाडीला किती नुकसान होणार? असे विचारले असता आंबेडकर म्हणाले की, त्याचा विशेष परिणाम होणार नाही. मला वाटत नाही की त्यांच्या राजीमान्यामुळं इतर पक्षांना वा महाविकास आघाडीला धक्का बसेल. एखादा मोठा नेता पक्ष सोडतो तेव्हा पक्षाचे नुकसान होते. पण पक्षावर व्यापक परिणाम होत नाही, असे आंबेडकर म्हणाले.
समोर पक्षच राहू नये, अशी भाजपची भूमिका आहे. याविषयी आंबेडकर म्हणाले की, भाजपला जे हवे आहे ते होईल असे मला वाटत नाही. कारण आता मतांच्या विभागणीवर परिणाम होईल, असं दिसतंय. लोकांनी कोणाला मत द्यायचे याबाबतचा त्यांचा निर्णय जवळपास निश्चित केलाय, असं दिसतय.