आंबेडकरांना मविआ सन्मान का देत नाही? ‘वंचित’ने घेतला पोल
VBA : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. सर्वच पक्षांच्या जागावाटपासाठी मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. अशातच विरोधी पक्षातील महत्वाचा मानला जाणारा वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या भूमिकेकडे सत्ताधाऱ्यांसह सर्वच पक्षांचं लक्ष लागून होतं. अखेर वंचित बहुजन आघाडीने (VBA) महाविकास आघाडीच्या (MVA) गोठात सामिल होण्याच निर्णय घेत जागावाटपाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. मात्र, जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचा ताळमेळ बसत नसल्याची परिस्थिती आहे. अशातच वंचितने थेट सोशल मीडियाद्वारे सवाल करीत महाविकास आघाडीच्या भूमिकेवर बोट ठेवलं आहे.
मविआ वंचित बहुजन आघाडी, बाळासाहेब आंबेडकर यांना योग्य सन्मान का देत नसेल?
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) March 8, 2024
दोन दिवसांपूर्वीच वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यात बैठक पार पडली. मुंबईत एका हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली असून प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीकडे एकूण 12 जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, या माहितीला अद्याप कोणीही दुजोरा दिलेला नाही. त्यावरुनच महाविकास आघाडीसमोर आता जागावाटपांचा पेच सुरु झाला आहे.
वंचित बहुजन आघाडीने ट्विट केलेल्या पोस्ट म्हटले, मविआ वंचित बहुजन आघाडी, बाळासाहेब आंबेडकर यांना योग्य सन्मान का देत नसेल? असा सवाल उपस्थित करीत वंचितने महाविकास आघाडीला डिवचलं आहे. तसेच पुढे चार पर्यायही दिले आहेत. त्यातील पहिला पर्याय म्हणजे ते आंबेडकरवाद विरोधी आहेत या पर्यायावर 26.8% जनतेने पसंती दिल्याचं सांगण्यात आलं तर दुसरा VBA वाढण्यापासून थांबवताय या पर्यायाला 48.8% लोकांनी वोट केलं. तिसरा म्हणजे बाळासाहेब खासदार नकोत 11.1% पर्याय सुचविला तर चौथा बहुजन मुस्लिम विरोधी आहेत या पर्यायाला 13.4 % लोकांनी पसंती दिली आहे.