ऑपरेशन ‘कोल्हे’ फत्ते… विखेंसाठी सेट झालं ‘शिर्डीचं’ गणित

ऑपरेशन ‘कोल्हे’ फत्ते… विखेंसाठी सेट झालं ‘शिर्डीचं’ गणित

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यानच आणखी एक ऑपरेशन सक्सेसफुलं केलं आहे. कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि युवा नेते विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांना थेट अमित शहा (Amit Shah) यांच्याच समोर हजर करत त्यांची नाराजी दूर केली आहे. आता कोल्हे यांनी महायुतीसोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या याच भुमिकेमुळे कोपरगावमधील तीन पिढ्यांचा राजकीय संघर्ष यंदाच्या निवडणुकीपुरता तरी टळला आहे. पण त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे पडसाद जिल्ह्यासह आजूबाजूच्या मतदारसंघावरही दिसून येणार आहेत. याचा सगळ्यात जास्त आणि थेट परिणाम होणार आहे तो महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या शिर्डी मतदारसंघावर. विखेंसाठी एक प्रकारे शिर्डी मतदारसंघाचे गणितच सेट झाले आहे… (Radhakrishna Vikhe Patil may benefit from Vivek Kolhe’s withdrawal from the assembly elections)

कोल्हे यांची महायुतीसोबत राहण्याची भूमिका विखेंसाठी कशी फायदेशीर ठरू शकते? पाहुया या व्हिडीओमधून…

आशुतोष काळे महायुतीत आल्याने कोपरगावच्या जागेचा पेच निर्माण झाला होता. भाजपकडून या मतदारसंघातून विवेक कोल्हे हेही दावेदार होते. पण भाजपकडून उमेदवारी मिळणार नसल्याने कोल्हेंनी काही दिवसांपासून शरद पवार यांच्याशी जवळीक वाढविली होती. त्यांनी पुण्यात पवार यांची भेटही घेतली होती. तेल्हापासून त्यांचा महाविकास आघाडीत प्रवेश होऊ शकतो अशी चर्चा सुरु झाली होती. बाळासाहेब थोरात यांनीही विवेक कोल्हे यांना गळाला लावण्यासाठी फिल्डिंग लावली होती.

मात्र कोल्हे यांचा प्रभाव केवळ कोपरगाव मतदारसंघावर नाही. त्यामुळे त्यांची नाराजी आणि पक्ष सोडून जाणे परवडणारे नाही, हे ओळखून देवेंद्र फडणवीस मागील अनेक दिवसांपासून कोल्हे यांची मनधरणी करत होते. कोल्हे यांच्या भूमिकेचा थेट परिणाम शिर्डी मतदारसंघावर होतो. गणेशनगर कारखाना परिसरात कोल्हे यांची मोठी ताकद आहे. तसेच आजूबाजूच्या येवला, सिन्नर, वैजापूर या मतदारसंघातही कोल्हे यांची भूमिका निर्णयाक ठरते. त्यामुळे कोल्हे यांनी महायुतीसोबतच रहावे, अशी भूमिका या सर्व आमदारांची होती.

फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मुंबईतील पहिली बंडखोरी रोखण्यात यश, नाराज राज पुरोहित भाजपसोबतच

हाच पेच सोडविण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी स्नेहलता कोल्हे आणि विवेक कोल्हे यांना थेट अमित शहा यांच्यापुढेच हजर केले. राधाकृष्ण विखे पाटील हे शहा यांच्या अत्यंत जवळचे समजले जातात. त्यामुळे शहा यांनीही तातडीने कोल्हे यांची समजूत काढण्यासाठी पावलं उचलली. या भेटीबाबत माहिती देताना विवेक कोल्हे म्हणाले, राज्यातील महायुतीमध्ये कोपरगाव विधानसभेचा निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कोल्हे कुटंबाची दखल घेवून सकारात्मक दृष्टीकोन दाखवला आहे. आगामी काळात राजकीय ताकद देऊन कोल्हे कुटुंबाचा स्व. शंकररावजी कोल्हे साहेब यांनी जपलेला सेवा हाच धर्माचा वारसा जोमाने पुढे नेण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने सकारात्मक विश्वास दिला आहे.

आता कोल्हे यांच्या या निर्णयाचा आशुतोष काळे यांना तर लाभ होणारच आहे. आता काळेंसमोर तुल्यबळ उमेदवारच नसल्याने ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता आहे. मात्र शिर्डी मतदारसंघात प्रभावती घोगरे यांनी भाजपची धाकधूक वाढवली होती. गतवेळच्या विधानसभा निवडणुकीपासूनच विखे विरूद्ध कोल्हे असा सामना सुरु होता. विखे यांचे मेव्हुणे राजेश परजणे यांची उमेदवारी कोल्हेंच्या पराभवाला कारणीभूत ठरली असल्याचे बोलले गेले. याला गणेश कारखान्याच्या निवडणुकीमुळे आणखी खतपाणी मिळाले. यामुळे कोल्हेंच्या मदतीची आस प्रभावती घोगरे यांना होती. विखेंविरुद्ध लढताना कोल्हेंना मानणारी मते हाच घोगरे यांचा विजयासाठीचा आधार होता.

सुनील टिंगरेंनी वडगाव शेरीचा सस्पेन्स संपवला; अजितदादा अन् पटेलांचा मला फोन

पण विवेक कोल्हे यांनी महायुतीसोबत राहण्याची भूमिका घेणे हा घोगरे यांच्यासाठीही हा धक्का मानला जात आहे. जणू त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. विवेक कोल्हे यांना गणेशनगर पट्ट्यात भाजपा उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासाठी सकारात्मक भूमिका घेणे क्रमप्राप्त बनणार आहे. विखे यांच्या विरोधी भूमिका म्हणजेच पक्षविरोधी भूमिका घेणे त्यांना अशक्य होणार आहे. त्यामुळे कोल्हे यांच्या या निर्णयाचा राधाकृष्ण विखे पाटील यांना फायदाच होणार आहे. त्याचवेळी वर्षानुवर्षे नेत्यासाठी लढायला तयार असणारे समर्थक कार्यकर्ते कोल्हेंच्या अचानक थांबण्याच्या भूमिकेने हिरमुसले आहेत. शिवाय कोल्हे-काळे या जुन्या राजकीय सामन्याला यंदा कोपरगावकर मुकणार असल्याने कार्यकर्त्यामध्येही नाराजीचा सूर दिसून येतो आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube