भाजपचं धक्कातंत्र सुरूचं! स्पर्धेत नसलेल्या मेधा कुलकर्णी होणार खासदार; अशोक चव्हाण अन् अजित गोपछडे यांनाही संधी
पुणे : राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असतानाच भाजपकडून महाराष्ट्रातील तीन जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. (BJP) दाखल झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आणि कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni ), भाजपचे राज्य उपाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे (Ajit Gopchde) यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (Ashok Chavan, Medha Kulkarni and Ajit Gopchde have been announced as Rajya Sabha candidates by BJP)
पक्षातील वरिष्ठांनी मला राज्यसभेची उमेदवारी देऊन जो विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा जी व केंद्रिय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस व भारतीय जनता पार्टी चे प्रदेशाध्यक्ष… pic.twitter.com/YmJrGLkPw3
— Dr. Medha Kulkarni (@Medha_kulkarni) February 14, 2024
केंद्रीय निवडणूक आयोगाने 15 राज्यांमधील राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. अन्य राज्यांमधील भाजप उमेदवारांची नावे पक्षाने जाहीर केलेली आहेत. मात्र मात्र मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरात या भाजपची सत्ता असलेल्या जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा झालेली नव्हती. आता गुजरातमधून जे.पी. नड्डा, गोविंदभाई ढोलकिया, मयंकभाई नायक, जसवंतसिंह सलमासिंग परमार तर महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ, अजित गोपछडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलिन होणार? बैठकीत गेलेल्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
महाराष्ट्रातील भाजप आणि मित्रपक्षांच्या मदतीने भाजपचे तीन उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. याच तीन जागांवरुन अनेक जण खासदार होण्यासाठी इच्छुक होते. यात भाजपतर्फे विनोद तावडे, पंकजा मुंडे, अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे, हर्षवर्धन पाटील, माधव भंडारी, अमरिश पटेल आणि विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती. या नेत्यांचे अर्जही तयार करण्याचे काम सुरू केले होते. मेधा कुलकर्णी आणि अशोक चव्हाण यांनी दोन दिवसांपासूनच कागदपत्रांची जमाजमव करण्यास सुरुवात केल्याने या दोघांचे नाव जवळपास निश्चित असल्याचे मानले जात होते.
मेधा कुलकर्णींचे पुनर्वसन :
पुण्यात मागील काही दिवसांपासून ब्राह्मण समाज भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोथरुड मतदारसंघातून मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी नाकारून चंद्रकांत पाटील यांना तिकीट देण्यात आले होते. त्यापाठोपाठ मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली होती. या दोन्ही गोष्टींमुळे भाजपकडून ब्राह्मणांना गृहीत धरले जात आहे, त्यामुळेच उमेदवारी दिली नाही, अशी भावना ब्राह्मण समाजात निर्माण झाली. त्याचा फटका कसबा पोटनिवडणुकीत बसला आणि रासने यांचा पराभव झाला, असे मानले जाते. त्यामुळेच पक्षाने कुलकर्णी यांना राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली असल्याचे बोलले जात आहे.