कोण तो रवींद्र चव्हाण? दापोलीत येऊन…; रामदास कदमांनी डागले पुन्हा टीकास्त्र
Ramdas Kadam : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली. महायुतीतील जागावाटपावरूनची धुसपूस आता चव्हाट्यावर येऊ लागली. शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला कमी जागा येण्याची शक्यता आहे. त्यामुळं दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. आजही त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर (BJP) जोरदार टीका केली. कोण रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan)? कोण तो केळकर? कोण तो गोव्याचा मुख्यमंत्री दापोलीत जाऊन शिवसेनेच्या लोकसभेच्या जागेवर अधिकार सांगतो, अशी टीका कदमांनी केली.
लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपामध्ये मिळत असलेल्या दुय्यम भूमिकेमुळे कदम चांगलेच आक्रमक झाले आहेत. ते सातत्याने आपली खदखद बोलून दाखवत आहेत. रवींद्र चव्हाण यांच्याकडून माझ्या मुलाला हेतूपुरस्सर त्रास दिला जातोय, भाजपने केसानं गळा कापू नये, अशी टीका त्यांनी केली होती. तर आजही दापोलीच्या सभेत बोलतांना त्यांनी पुन्हा एकदा भाजपच्या नेत्यांवर टीका केली. कदम म्हणाले की, दापोली नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकत होता. मात्र उद्धव ठाकरेंनी योगेश कदमला बाजूला सारून राष्ट्रवादीच्या हातात नगरपरिषद दिली. तेव्हा उद्धव ठाकरेंकडून शिवसेना संपण्याचा प्रयत्न चालला होता. तर आज युती असतांना इथल्या भाजपकडून शिवसेना संपण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका कदमांनी केली.
मोठी बातमी : लोकसभा तोंडावर असतानाच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा
ते म्हणाले, कोण तो रविंद्र चव्हाण? इकडे येतो 10-15 कोटीची कामं घतो. कोण आहे तो भाजपचा आमदार केळकर? तो इकडे स्थानिक आमदारांना बाजूला ठेवून भूमिपूजन करतो. कोण तो गोव्याचा मुख्यमंत्री? दापोलीत येऊन शिवसेनेच्या लोकसभेच्या जागेवर अधिकार सांगतो. चाललंय काय तुमचं? असा खडा सवाल कदमांनी भाजपला केला.
भाजपने केसाने गळा कापू नये, अशा शब्दात कदमांनी दोन दिवसांपूर्वी भाजपवर टीका केली होती. त्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आम्ही ११५ आमदार असूनही शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केले, असं प्रत्युत्तर दिलं होतं. त्यावरही कदम यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, होय शिंदे साहेब, आपली संख्या कमी असतांना तुम्हाला मुख्यमंत्री केलं. पण, जहाल शिवसेनेचे ४० आमदार, १३ खासदार १० अपक्ष घेऊन उद्धव ठाकरेंसारख्या गद्दाराला धडा शिकवण्याचे काम फक्त एकनाथ शिंदेचं करू शकतात, असं कदम म्हणाले.