महसूल खात्यात इतिहासातील सगळ्यात मोठा घोटाळा झाल्याची महसूलमंत्री बावनकुळेंची कबुली
आतापर्यंतच्य इतिहासात महसूल खात्यात झालेला हा सगळ्यात मोठा घोटाळा असल्याचं देखील मंत्री बावनकुळे यांनी कबूल केलं.
Revenue Minister Bawankule admits that there has been a major scam : महसूल खात्यात आतापर्यंतच्या इतिहासात सगळ्यात मोठा घोटाळा झाल्याची माहिती खुद्द महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषद सभागृहात दिली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट विधानपरिषदेत ही कबुली दिल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शुद्धलेखनात बदल करण्याच्या नियमाखाली सातबारा उताऱ्यात बदल केल्याची बाब समोर आली आहे. आतापर्यंतच्य इतिहासात महसूल खात्यात झालेला हा सगळ्यात मोठा घोटाळा असल्याचं देखील मंत्री बावनकुळे यांनी कबूल केलं.
एक ते दीड लाख शेतकऱ्यांना फसवल्याची कबुली
महसूल विभागाच्या कलम 155 अंतर्गत अधिकाऱ्यांनी एक ते दीड लक्ष शेतकऱ्यांना फसवल्याची कबुली दिली. सभागृह संपायच्या आत दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं.
अनिल परबांच्या प्रश्नावर उत्तर
दरम्यान, यावेळी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी प्रश्न उपस्थित केले. अनिल परब म्हणाले, महसूल कायद्याने जे अधिकार दिले जातात त्यामध्ये विविध कलमे देण्यात आली आहेत. ज्यामध्ये अधिकाऱ्यांना त्याचे अधिकार मिळतात. अधिकारी बऱ्याच वेळा चुका दुरुस्त करण्यासाठी कलमांचा वापर करतात. त्यामुळे फेरफार करतात हेच आणि दुरुस्ती देखील हेच करतात. यामुळे ज्यावेळी शेतकरी फेरफार दुरुस्तीसाठी जातो, त्यावेळी त्याला हे अधिकारी रखडवतात.
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
मी या खात्याचा मंत्री झालो तेव्हा अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या. कलम 155 चा दुरुपयोग केला जात आहे. शुद्धलेखनात झालेली चूक सुधारणे हेच काम तहसीलदारांचं आहे. ध चा मा… करत कोट्यवधी शासनाचा निधी वापर केला गेला. मालकी हक्काचा देखील वापर केला गेला आहे. आता आम्ही सगळीकडे तपास करण्याचे आदेश दिले आहेत. महसूल खात्यात आतापर्यंत सर्वात मोठी अनियमितता झाली आहे. 155 चा दुरुपयोग करून एखाद्याला मोठ्या माणसाने गरिबाला फसवलं आहे. छोट्या माणसाला हाती घेऊन हे एक मोठं काम केलं आहे.
प्रदूषण रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय, पर्यावरण कर वाढला; मोटार वाहन कर सुधारणा विधेयक एकमताने मंजूर
प्रवीण घेडा यांचा रिपोर्ट आला आहे. महसूल खातं पूर्ण खाली होऊन जाईल. जानेवारीमध्ये हा अहवाल आला. ज्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. असं राज्यात किती झालं आहे आणि याकरिता केवळ कारवाई नाही तर, सर्व रिवोक करा असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जेवढा 155 चा दुरुपयोग केला ते दुरुस्त करा. पुढच्या 7 दिवसांत कारवाई करू आणि पुढच्या अधिवेशनात संपूर्ण चित्र सभागृहात दिसेल आणि कितीही मोठा अधिकारी असेल त्याच्यावर देखील कारवाई होईल. मी महसूलमंत्री आहे, मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. या अधिकाऱ्यांचं करायचं काय, याबाबत पुढील काही दिवसांत कारवाई होईल, असं बावनकुळे म्हणाले.
नेमके प्रकरण काय आहे?
जमीन महसूल कायद्यातील कलम 155 चा वापर प्रामुख्याने 7/12 उताऱ्यावरील लेखनदोष किंवा शुद्धलेखनातील चुका दुरुस्त करण्यासाठी केला जातो. मात्र, पुणे जिल्ह्यात काही महसूल अधिकाऱ्यांनी या कलमाचा गैरवापर करून जमिनीच्या मालकी हक्कांतच परस्पर बदल केले. जुलै-ऑगस्ट 2025 दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. आमदार अनिल परब यांनी या गंभीर विषयाकडे लक्ष वेढल्यानंतर महसूल विभागात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता विभागीय आयुक्तांच्य अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली होती.
विभागीय आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालात महसूल प्रशासनातील भोंगळ कारभाराचे वाभाडे काढण्यात आले आहेत. अनेक प्रकरणांत मूळ मालकाची संमती नसताना देखील 7/12 मध्ये बदल करण्यात आले. नियमबाह्य पद्धतीने बेकायदेशीर आदेश पारित करून खाजगी हितसंबंध जपले गेले. जमिनी बिगरशेती करताना आणि मालकी हस्तांतरित करताना गंभीर अनियमितता आढळली.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत कबुली
या प्रकरणावर विधान परिषदेत वादळी चर्चा झाली. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासकीय स्तरावर झालेल्या या मोठ्या चुकीची कबुली दिली. शुद्धलेखनात बदल करण्याच्या नावाखाली सातबारा बदलले गेले, ही बाब गंभीर आहे. महसूल खात्याच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा असू शकतो, असे विधान त्यांनी सभागृहात केले. सुमरे 1 ते 1.5 लाख शेतकरी या प्रक्रियेत भरडले गेल्याचे देखील त्यांनी मान्य केले.
आमदार अनिल परब यांनी या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आणि सहभागी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार, आता या घोटाळ्यातील दोषी तहसीलदारांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत कोणावर कारवाई होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र अधिवेशन संपायच्या आत दोषींवर कारवाई करू, असं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिलं.