ब्रेकिंग- भाजपच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; देवेंद्र फडणवीसांकडे न्यायाची मागणी
Sangola BJP Leader Pratapsinh Karche Murder Case; सांगोल्यात भाजपचे माजी पदाधिकारी प्रतापसिंह करचेंच्या हत्या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली
Sangola BJP Leader Pratapsinh Karche Murder Case: सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात भाजप युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष प्रतापसिंह करचे यांच्या हत्येप्रकरणी राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 27 ऑक्टोबरच्या मध्यरात्री तिप्पेहळ्ळी परिसरात कारमधून प्रवास करत असताना करचे यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी हर्षवर्धन ऐवळे आणि विक्रम घरडे या दोघांना अटक केली आहे. दरम्यान, करचे यांच्या कुटुंबीयांनी शिंदे सेना नेत्यांवर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे (Devendra Fadanvis) न्यायाची मागणी केली आहे.
मराठवाडा वॉटरग्रीडचा खर्च 1 लाख कोटींवर; निधीसाठी वित्तीय संस्थांकडून कर्ज घेणार
मध्यरात्रीच्या प्रवासात जीवघेणा हल्ला
करचे हे 27 ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे 2 वाजता आपल्या वाहनातून जात होते. त्यांच्यासोबत असलेल्या दोघांनीच गोळीबार केल्याचा आरोप तपासात समोर आला आहे. या हल्ल्यात करचे यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर सांगोला पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली असून, हत्येची पार्श्वभूमी शोधण्याचे काम पोलीस करत आहेत.
कुटुंबीयांकडून राजकीय कटाचा दावा
करचे यांच्या पत्नी अर्चना यांनी या हत्येमागे केवळ वैयक्तिक कारण नसून राजकीय कट असल्याचा आरोप केला आहे. आटपाडीतील शिंदे सेनेचे नेते आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तानाजी पाटील, त्यांचे बंधू शिवाजी पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील यांनी सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
या संदर्भात सोलापूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दिल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. मात्र, या व्यक्तींविरोधातील आरोपांची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यांची भूमिका आणि आरोपांमधील तथ्य पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे.
फडणवीसांकडे न्यायाची मागणी
करचे यांच्या हत्येनंतर स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. राज्यात भाजप सत्तेत असतानाही पक्षाच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्याचा मुद्दा उपस्थित करत अर्चना करचे यांनी नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न विचारला.
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालून कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. सध्या पोलिसांचा तपास सुरू असून, हत्येमागील नेमके कारण आणि कथित राजकीय सहभागाबाबत तपासानंतरच स्पष्टता येणार आहे.