‘गुवाहाटीवरून आल्यापासून शिंदेंच्या तोंडाला रक्त लागलंय’, संजय राऊत यांचा खोचक टोला
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगण्याची चिन्हं दिसंत आहेत. तर दुसरीकडे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या अटकेने राष्ट्रीय पातळीवर राजकारण तापू लागलय. भाजपावर (bjp) विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी यासंदर्भात माध्यमांशी बोलताना भाजपावर तिखट शब्दांत टीका केली.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) खोटे बोलत आहेत. गुवाहाटीला जाऊन आल्यापासून त्यांच्या तोंडाला रक्त लागले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे संयमी नेतृत्व आहे. सरकारमध्ये असताना त्यांनी कधीही सुडाचे राजकारण केले नाही. तेव्हा एकनाथ शिंदे हे देखील सरकारमध्ये होते. तेव्हाच ते का बोलले नाहीत. म्हणजे तेव्हाच्या कटात तेदेखील सामील होते, असे समजायचे का ? अशा खोचक सवाल संजय राऊतांनी केला.
शिंदे महाराष्ट्राचे की गुजरातचे मुख्यमंत्री? आदित्य ठाकरेंनी भर सभेत ललकारलं
“सध्या विरोधकांच्या बाबतीत पडद्याच्या पाठीमागे काय कारस्थानं चालू आहेत, त्यांचा सुगावा लागत असतो. मला जेव्हा अटक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली, तेव्हाही मी सांगत होतो की मला अटक होतेय. देशातलं वातावरण दिवसेंदिवस आणीबाणीपेक्षा भयंकर होत असताना दिसून येत आहे. राजकीय विरोधकांना विविध प्रकरणांमध्ये गुंतवून, सरकारला प्रश्न विचारणाऱ्याना गुंतवायचं, अटक करायची, जामीन मिळू द्यायचा नाही, केंद्रीय यंत्रणांचा त्याकरिता वापर करायचा हे उघडपणे चालू आहे. दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड या राज्यात प्रामुख्याने चालू आहे. निवडणुका जवळ येत आहेत, तसतसं हे परत- परत वाढत जाणार आहे”, असं संजय राऊत म्हणाले.