Sanjay Raut : ‘आमचा नाही, न्यायालयाचाच दबाव’; राणेंच्या आरोपांवर राऊतांचं थेट उत्तर
Sanjay Raut : आमदार अपात्रता प्रकरणी पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानेच नाराजी व्यक्त केल्यानंतर घडामोडींना वेग घेतला आहे. दरम्यान, या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर संजय राऊत आणि अंबादास दानवे दबाव टाकत आहेत, असा आरोप भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला होता. त्यांच्या याच आरोपाला आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत आमदार अपात्रता प्रकरणी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली.
ते म्हणाले, विधानसभा अध्यक्षांवर आम्ही दबाव टाकत नाही. सर्वोच्च न्यायालयाचाच दबाव आहे. कोर्टाच्या निर्णयावरच आम्ही बोलत आहोत. राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. वकिलीची सनद घेताना घटनेचीही शपथ त्यांनी घेतली आहे. त्यांना काही वाटत नसेल तर विधीमंडळाच्या काळ्याकुट्ट इतिहासातील पान त्यांच्या नावावर लिहिलं जाईल. ते बेकायदेशीर सरकारला चालवायला एक प्रकारे समर्थनच देत आहेत. याचे चिंतन त्यांनी केले पाहिजे. या सगळ्या प्रकारांचा रोष जनतेच्या मनात असून याची किंमत मोजावीच लागेल असा इशारा राऊत यांनी दिला.
‘फडणवीस सत्तेच्या नशेत, सत्तेने भ्रष्ट? इतकी मस्ती कशी’; प्रकाश आंबेडकरांनी फडणवीसांना घेरलं
आमचा नाही, न्यायालयाचाच दबाव
आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर राऊत यांनी पुन्हा एकदा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हल्लाबोल केला. विधानसभा अध्यक्ष पक्षाचे आमदार आहेत आणि त्यांनी अनेक पक्षांतरे केली आहेत. त्यामुळे पक्षाबद्दल जी नीतिमत्ता असते ती त्यांची तपासावी लागेल. अनेक पक्षांतून येऊन अध्यक्ष झाल्यानंतर ज्यांन घटनाबाह्य सरकार बसवलं यांच्याबद्दल त्यांना किती वेदना आहेत. दुःख आहे हा तपासाचा विषय आहे. आमदार अपात्रता प्रकरणात निर्णय घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा दबाव आहे. दुसऱ्या कोणाकडून दबाव निर्माण केला जात नाही, असे म्हणत त्यांनी भाजप आमदार नितेश राणे यांना प्रत्युत्तर दिले. जनतेच्या मनात रोष आहे या सगळ्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही राऊत यांनी दिला.
आता मोदींची जादू चालणार नाही
आधी मोदी है तो मुमकीन है अशा घोषणा दिल्या जात होत्या. आता मात्र आमच्या इंडिया आघाडीनंतर त्यांनाही एनडीए आघाडीची आठवण झाली आहे. थोडक्यात अकेला मोदी काफी है, असे चित्र सध्या नाही. इंडिया आघाडी निर्माण झाल्यानंतर मोदी अकेला नहीं चलेगा, ही जाग भाजपला आली. त्यामुळे त्यांन इथून तिथून लोक जमा केले. आताची एनडीए कमकुवत आहे. एआयएडीएमकेही या आघाडीतून नुकताच बाहेर पडला आहे. यानंतर अजूनही काही लोक भाजपमधून बाहेर पडतील नव्हे भाजपाच फुटेल.