आंबेडकरांविरोधात उमेदवार देऊन मोठी चूक करत आहात; शरद पवारांना कपिल पाटलांचं भलंमोठं पत्र

आंबेडकरांविरोधात उमेदवार देऊन मोठी चूक करत आहात; शरद पवारांना कपिल पाटलांचं भलंमोठं पत्र

Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे.(MVA) पण वंचित बहुजन आघाडीचे (VBA) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात महविकास आघाडीकडून डॉ. अभय पाटील (Dr. Abhay Patil) यांना अकोल्यातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) सात तर शरद पवार गटाच्या (NCP) एका उमेदवाराला पाठिंबा दिल्याने प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार देऊ नये अशी भूमिका महाविकास आघाडीमधील काही नेत्यांनी घेतली आहे. तर आता समाजवादी गणराज्य पार्टीचे आमदार कपिल पाटील (Kapil Patil) यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना पत्र लिहून प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देण्याचं आवाहन केले आहे. याच बरोबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची 14 एप्रिलला जयंती आहे. या पार्श्वभूमीवर अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा जाहीर करावा अशीही त्यांनी विनंती केली आहे. सध्या हा पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आमदार कपिल पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र हा फुले – शाहू – आंबेडकर विचारधारेवर उभा आहे. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळीत सर्वाधिक योगदान महाराष्ट्रानेच दिलं. छत्रपती शिवरायांचा वारसा असलेला महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढे कधी झुकला नाही. नथुरामी फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात तुम्ही महाराष्ट्रात महाविकास आघाडी उभी केली. म्हणूनच समाजवादी गणराज्य पार्टी आणि राज्यातील सर्व डाव्या पुरोगामी शक्ती तुमच्या सोबत आहेत. तथापी या आघाडीत नथुरामी फॅसिझमच्या विरोधात सातत्याने सर्वात प्रखर भूमिका घेणारे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी यांना सामावून घेण्यात आपल्या सर्वांना अपयश आले. त्याची सल आपल्याही मनात असेल.

प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी यांना महाविकास आघाडीत सामावून घेता आले नाही म्हणून त्यांना भाजपची बी टीम म्हणून हिणवले जात आहे, अपमानित केले जात आहे. हे कमी की काय म्हणून आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाच्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या विरोधी प्रचारात उतरवण्यात आले आहे. हे खरोखरच दुर्मानवी आहे. दुर्दैवी नव्हे दुर्मानवी यासाठी की बाबासाहेबांचा दैवावर विश्वास नव्हता आणि सश्रद्ध माणसं मानवी चुकांसाठी दैवाला दोष देत नाहीत. ऐतिहासिक जखमांचं ज्यांना भान आहे, त्यांनी त्यावरची खपली का काढावी? हे समजत नाही.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पणतू शाहू छत्रपती महाराज यांना कोल्हापूर लोकसभेत उमेदवारी देण्यासाठी आपण पुढाकार घेतला. ही आशा आणि विश्वास निर्माण करणारी घटना आहे. फुले – शाहू – आंबेडकरांचा महाराष्ट्र फॅसिस्ट जातीयवादी शक्तींना साथ देत नाही. हे आपण दाखवून दिलं आहे. त्याच भूमिकेतून खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी शाहू छत्रपती यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

बारामतीत सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात सुद्धा उमेदवार त्यांनी दिलेला नाही. मात्र डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे खरे वारस प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात कॉँग्रेसचा उमेदवार देऊन आपण मोठी चूक करत आहोत. अकोल्यात काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांचे वडील संघ – भाजपचे होते म्हणून आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण डॉ. अभय पाटील हे सुद्धा त्याच विचारांचे समर्थक आहेत. बाबरी मशीद पाडण्याचं आणि मुस्लिम विरोधी नफरतीचं ते आजही समर्थन करतात, तरीही ते आघाडीचे उमेदवार आहेत, हे धक्कादायक आहे. उद्या, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा जाहीर करावा, ही आग्रहाची विनंती.

आदरणीय उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे नेते आहेत आणि आपण पालक आहात, त्यामुळे आपण दोघांनी पुढाकार घेणं आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न न देणं, संसद भवनात फोटोही न लावणं, मंडल आयोग दडपून ठेवणं अशा काँग्रेसच्या ऐतिहासिक चुकांचं पापक्षालन करण्याची याशिवाय दुसरी वेळ नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज