Shashikant Warise मृत्यू प्रकरण : हत्या करणारा राणे पिता-पुत्रासोबत असतो, विनायक राऊत यांचा आरोप

  • Written By: Published:
Shashikant Warise मृत्यू प्रकरण : हत्या करणारा राणे पिता-पुत्रासोबत असतो, विनायक राऊत यांचा आरोप

राज्याच्या राजकारणात रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारिसे (Shashikant Warise) मृत्यू प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात विरोधकांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार शशिकांत वारिसेंच्या हत्याऱ्यांना पोसले, असा गंभीर आरोप त्यांनी केला .

खासदार राऊत म्हणाले, की गुंडगिरी करणारा हा नीतेश राणे आणि नारायण राणे यांच्यासोबत राहणारा गुंड आहे. त्यांच्या चिथावणीखोरीमुळे वारिसे यांच्यासारख्या पत्रकारांची हत्या करण्यात येत आहे.

यावेळी विनायक राऊत म्हणाले की “काही दिवसापूर्वी सिंधुदुर्गमध्ये जिल्हा नियोजनची बैठक झाली होती. त्यावेळी बैठकीत मालवचं सी-वर्ल्ड आणि रिफायनरी याच्याविरोधात येणाऱ्यांची गय करू नका; प्रसंगी पोलिसांचा वापर करून प्रकल्प राबवा, असं वक्तव्य केलं होतं. आणि हा गुंडगिरी करणारा आंबेरकर नारायण राणे किंवा निलेश राणेंबरोबर असतो. त्यांच्या चिथावणीमुळे वारीसेसारख्या पत्रकाराची हत्या करण्याचं षडयंत्र आंबेकरने आखलं.”

Shashikant Warise : विनायक राऊतांच्या आरोपांवर राणे संतापले; म्हणाले, अजून किती दिवस..

शशिकांत वारीसे मृत्यू प्रकरण आहे तरी काय?

शशिकांत वारीसे हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात महानगरी टाइम्स या वृत्तपत्राचे पत्रकार होते. त्यांचा सोमवार दि. 6 फेब्रुवारी रोजी सकाळी अपघात झाला. राजापूर या ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपावर थार गाडीने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यानंतर त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले. परंतु दुसऱ्या दिवशी मंगळावर दिनांक 7 फेब्रुवारी रोजी त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी व सहयोगी पत्रकारांनी संशय व्यक्त केला आहे.

या अपघातानंतर वारीसे यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे 302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी कार चालक पंढरीनाथ आंबेरकर याला अटक केली असून जिल्हा न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

शशिकांत वारीसे हे कोकणामध्ये रिफायनरीच्या विरोधात होते. त्यांनी कोकणामध्ये रिफायनरी सारखा प्रकल्प नको, अशी भूमिका घेतलेली होती. तसेच या भूमिकेमुळे आपल्या जीवाला बरे वाईट होण्याचा धोका देखील असू शकतो, हे त्यांना माहीत होते, असे वारीसे यांच्या कुटुंबियांनी सांगितले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोकणामध्ये रिफायनरी प्रकल्पावरून संघर्ष सुरू असून यामध्ये काही नागरिक या रिफायनरीचे समर्थन करत आहेत तर काहीजण विरोधात आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube