‘महाराष्ट्रावर दहा लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर…’ संजय राऊतांनी थेट अजित पवारांचं नाव घेतलं
खासदार संजय राऊत यांनी राज्यातील आर्थिक परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त करत अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला.

Sanjay Raut Criticize Ajit Pawar : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यातील आर्थिक परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त करत अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राऊत म्हणाले की, गेल्या तीन महिन्यात राज्याने 24 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. पण विकासाचे काम ठप्प आहेत. बेरोजगारी वाढली असून फक्त मुख्यमंत्रीच्या जवळच्या लोकांकडे प्रकल्प सुरू असल्याची टीका त्यांनी केली.
राज्याची अवस्था नेपाळसारखी
आर्थिक शिस्त लावणारे अजित पवार यांना (Ajit Pawar) हे लक्षात घ्यायला हवे की, राज्यावर दहा लाख कोटींच्या कर्जाचा बोजा आला आहे. हा निधी राज्याच्या विकासासाठी नाही तर काही विशिष्ट लोकांच्या खिशात जात आहे, असे राऊत (Sanjay Raut) म्हणाले. त्यांनी अजित पवार यांना विचारले की, आर्थिक दृष्ट्या राज्याची अवस्था नेपाळसारखी झाली आहे, तर या परिस्थितीत अर्थमंत्री म्हणून तुम्ही काय भूमिका घेणार आहात?
दहा लाख कोटींचे कर्ज
एसआरए, लाडकी बहीण योजना आणि कौशल्य विकास योजना यांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप करत राऊत म्हणाले की, अजित पवार या घोटाळ्यांवर लक्ष ठेवतात, पण तरीही अनेक प्रकल्पांमधून निधी गैरप्रकाराने जात आहे. त्यावर अजित पवारांचे स्पष्ट विधान अपेक्षित आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर देखील चिंता व्यक्त करत राऊत म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी, नुकसानभरपाई किंवा हमीभाव मिळत नाही, तरीही दहा लाख कोटींचे कर्ज घेतले गेले. या प्रश्नावर अर्थमंत्री अजित पवारांकडून योग्य पावले उचलली जाणे आवश्यक आहे.
प्रकल्पांमध्ये प्रचंड घोटाळे
खासदार संजय राऊत यांनी राज्यातील आर्थिक भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. राऊत म्हणाले की, नागपूर आणि विदर्भमध्ये कौशल्य विकास योजना, लाडकी बहीण योजना आणि एसआरए प्रकल्पांमध्ये प्रचंड घोटाळे सुरू आहेत. या योजनांचा लाभ गैरप्रकाराने भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी घेत आहेत. जसे बोगस स्वातंत्र्य सैनिकांना पेन्शन चालू आहे, तसेच या योजनांमधून निधी काही विशिष्ट लोकांच्या खिशात जात आहे. ही लिस्ट मी आजच लोढांकडे पाठवली आहे.
राज्यावर दहा लाख कोटींच्या कर्जाचा बोजा आला आहे. यासाठी जबाबदार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजित पवार आणि मानसिंग, असे राऊत यांनी स्पष्ट केले. भ्रष्टाचारामुळे राज्याची आर्थिक स्थिती गंभीर बनली असल्याचं देखील राऊतांनी स्पष्ट केलंय.