Supriya Sule : ‘फडणवीस फेल झाल्याने ते पवारांचे नाव घेत आहेत’

  • Written By: Published:
Untitled Design (13)

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या संमतीनेच पहाटेचा शपथविधी झाला होता असा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. फडणवीसांच्या या गौप्यस्फोटानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. फडणवीसांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीसांना सध्या शरद पवारांचा सहारा आहे, अशा आशयाचं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं.

फडणवीसांनी केलेल्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुम्ही जो प्रश्न विचारत आहात, तो मुळात देशातील चर्चेचा मुद्दाच नाही. तो फक्त देवेंद्र फडणवीसांना राजकारणासाठी कदाचित सोयीचा असेल. प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्या बातम्या लागत नसतील, म्हणून ते सध्या शरद पवारांचा सहारा घेत असतील, अशी शक्यता आहे, अशी खोचक टीकाही यावेळी सुप्रिया सुळेंनी केली.

Amrita Fadnavis यांचा ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त खास व्हिडिओ

त्या म्हणाल्या, बिचाऱ्या देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या पक्षामध्ये बाकीचे लोक हलायला जागा देत नसतील. त्यामुळे ते पवारांचं नाव घेऊन दररोज काहीतरी नवीन वावड्या उठवत आहेत, अशी शक्यता आहे. या राज्याची सहा-सहा खाती फडणवीसांकडे असून ती सर्व खाती फेल गेल्याचा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला. ज्या व्यक्तीकडे अर्थमंत्रीपद आहे आणि त्याच्यावर अर्थसंकल्पाची जबाबदारी आहे. अशा व्यक्तीला अशी कंड्या पिकवायला वेळ कसा मिळतो? त्यामुळे मला आपल्या राज्याची चिंता वाटायला लागली आहे, अशी खंतही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

Tags

follow us