सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद जाणार ? पार्थ पवार-तटकरे संघर्ष टोकाला !

Sunil Tatkare: प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंविरोधात नाराजी राष्ट्रवादीत उघडपणे व्यक्त केली जाऊ लागली आहे.

  • letsupteam
  • Written By: Published:
Sunil Tatkare

Sunil Tatkare VS Parth Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडतायत. दोन दिवसांत दोन नव्या नियुक्ता झाल्या आहेत. राष्ट्रवाजीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे, तर युवती प्रदेशाध्यक्षपदी सोशल मीडियामध्ये स्टार असलेल्या निर्मला नवले. आता राजकीय चर्चा सुरू झालीय, सुनील तटकरे (Sunil Tatakre) यांचेही प्रदेशाध्यक्षपद जाणार का ? राष्ट्रवादीचे राज्यसभा सदस्य पार्थ पवार (Parth Pawar) व प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांच्यामध्ये संघर्ष उफाळून आल्याची राजकीय चर्चा सुरू आहेत. या दोघांमध्ये कधी-कधी खटके उडाले हे पाहूया…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक बदल झाले. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या. पार्थ पवार व जय पवार यांनी पक्षात लक्ष घातले. पार्थ पवार राष्ट्रीय महासचिव झाले आणि राज्यसभेवर गेले. जय पवारही राष्ट्रीय राजकारणात आले. त्यामुळे तिघा माय-लेकांने पक्षावर कमांड मिळविली. त्यातून जुने राष्ट्रवादीचे नेते नाराज झाल्याचे बोलले जात होते. त्यात राष्ट्रीय कार्यकारिणीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच नाव नसल्याचे पत्र समोर आले. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी स्पष्टीकरण देत तांत्रिक चूक असल्याचे सांगितले. त्यानंतर सुनील तटकरे यांच्या मुलाला स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेवर घेण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादी सर्वकाही आलबेल असल्याचे बोलले जात होते.

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंविरोधात नाराजी
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंविरोधात नाराजी राष्ट्रवादीत उघडपणे व्यक्त केली जाऊ लागली आहे. त्यात राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्याशी काल राष्ट्रवादीच्या अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व खासदार पार्थ पवार यांची बैठक झाली. प्रशांत किशोर यांना राष्ट्रवादीने राजकीय सल्लागार नेमल्याचे बोलले जात आहे. प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. तशा बातम्या आल्यानंतर सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर राष्ट्रवादीसाठी काम करतात हे मला माहिती नाही. त्यांना राजकीय सल्लागार नेमल्याची माझ्याकडे माहिती नाही. त्यांची पक्षाने सल्लागार म्हणून नियुक्ती केली असती तर मला त्याची नक्कीच माहिती असती. प्रदेशाध्यक्षपदावरून मला हटविण्याचा प्रशांत किशोर यांनी सल्ला दिला असे वाटत नाही, असे तटकरे यांनी सांगितले. तर पार्थ पवारांनी तटकरे यांना पदावरून हटविण्याबाबत सल्ला दिला नसल्याचे स्पष्ट केले.

राजकीय सल्लागारावर अवलंबून निर्णय घेण्यापेक्षा जनतेत मिसळल्याने राजकीय यश प्राप्त होते. यावर आपला विश्वास आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. प्रशांत किशोर यांनी नुकतेच बंकीपूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. त्यानंतर सुनेत्रा पवार व प्रशांत किशोर यांची बैठक झालीय. ही भेट भाजपला रूचलेली नाही. त्यामुळे तटकरे यांनी प्रशांत किशोर यांच्याविरोधात व्यक्तव्य केल्याचे बोलले जात आहे. मला कधी सल्लागाराची गरज वाटली नाही. मी आठ वेळा महाराष्ट्राचा दौरा केला आहे, असा टोलाही तटकरे यांनी लगावला आहे. हा टोला पार्थ पवार यांनाच असल्याचे बोलले जात आहे.

सुनील तटकरेंना पक्षातून विरोध
सुनील तटकरेंविरोधात आता पक्षातील लोकही उघडपणे बोलू लागले होते. पुण्यातील राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी तटकरे यांच्या राजीनाम्याची मागणी करून मोठा बॉम्ब फोडलाय. दादा पक्षात असतानाच प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय झाला होता असा दावा त्यांनी केलाय. जर पक्ष संघटन मजबूत करायची असेल तर बदल व्हायला हवा, असे रुपाली ठोंबरे पाटील यांचे म्हणणे आहे.

उमेश पाटील यांचीही पक्षातील नेत्यांविरोधात पोस्ट
राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनीही एक पोस्ट करत पक्षातील नेत्यांवर टीका केली. दादांच्या नावावर, दादांच्या विश्वासावर आणि दादांनी दिलेल्या संधींवर आयुष्यभर मोठे झालेले काही लोक दादांच्या परिवाराला मानसिक त्रास होईल असं वातावरण निर्माण करत असतील, तर मनात एक प्रश्न निर्माण होतो, असा सवाल उमेश पाटील यांनी केला आहे. दुर्दैवाने, वहिनींचे अश्रू सुकण्याआधीच पक्षाबद्दल आणि नेतृत्वाबद्दल सातत्याने संशयाचं वातावरण निर्माण करणाऱ्या बातम्या माध्यमांमध्ये पेरल्या जाऊ लागल्या. कार्यकर्त्यांच्या आणि आमदारांच्या मनात पक्षाच्या राजकीय भविष्याबद्दल संभ्रम निर्माण होईल,अशी नियोजनबद्ध चर्चा केली, असा पोस्टमध्ये उमेश पाटील यांनी उल्लेख केलाय. त्यांनी कुणाचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख तटकरे, प्रफुल्ल पटेलसह पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर होता.

एकंदरित प्रशांत किशोर यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व पार्थ पवार यांची बैठक होणे. त्यानंतर पक्षातील इतर नेत्यांनी तटकरेंविरोधात थेट भूमिका घेतलीय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे बदल घडण्याचे संकेत यातून मिळत आहेत.

follow us