महेश लांडगेंच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे आक्रमक; ‘पहिला वार माझ्यावर करा’

दांपत्याच्या हत्येच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला संबोधित करताना आमदार महेश लांडगे यांनी भाषण केले.

News Photo   2026 08 24T172956.663

सांगलीतील एका मोर्चात भाजप (BJP) आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या कथित प्रक्षोभक वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लांडगे यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत त्यांना थेट आव्हान दिले आहे. ‘पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा’, असे म्हणत सुळे यांनी लांडगे यांच्यावर निशाणा साधला.

सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे मनीषा केसरेकर आणि मोहन केसरेकर या दांपत्याच्या हत्येच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला संबोधित करताना आमदार महेश लांडगे यांनी भाषण केले. यावेळी ‘हातात सापडला तर तोडून टाका’, अशा आशयाचे वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

पुणे महापालिकेत भाजप-राष्ट्रवादीचा वाद चिघळला; सुनील टिंगरेंचे फडणवीसांना थेट पत्र

लांडगे यांच्या या कथित प्रक्षोभक भाषेवर सुप्रिया सुळे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. अशा प्रकारची भाषा वापरणाऱ्या आमदारांवर तातडीने कारवाई करून त्यांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सरकारने अशा वक्तव्यांना वेळीच आळा घालण्याची गरज असल्याचेही सुळे यांनी म्हटले आहे.

यावेळी सुळे यांनी सत्ताधारी पक्षातील काही आमदारांच्या वक्तव्यांवरही प्रश्न उपस्थित केले. नितेश राणे, गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप, महेश लांडगे आणि अक्षय कर्डिले यांच्यासह काही आमदारांकडून सातत्याने प्रक्षोभक वक्तव्ये केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्राची शांतता आणि सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या प्रवृत्तींना सरकारने आवर घालावा, असे आवाहनही सुप्रिया सुळे यांनी केले.

follow us