सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामतीचं गणित कसं अवघड आहे, हे समजून घ्या!

  • Written By: Published:
सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामतीचं गणित कसं अवघड आहे, हे समजून घ्या!

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा बारामतीतून पराभव सहज शक्य होईल, असे बेधडक विधान आतापर्यंत कोणी केलं नसेल. पण आता २०२४ च्या निवडणुकीत सुळे या पराभूत होऊ शकतात, असे आता काहीजण थेटपणे म्हणत आहेत. बारामती हा पवारांचा किल्ला. पवारांच्या मुलीचा पराभव होईल, असं कोणाच्या मनातही या आधी आले नसते. पण असे आता का वाटत, याचे उत्तर  कागदावरच्या गणितात आणि गेल्या निवडणुकांतील मतदानाच्या आकडेवारीत आहे. (Supriya Sule Vs Snetra Pawar)

निवडणुकीचा विजय मतांच्या आकडेवारीवर अवलंबून नसतो, हे खरे आहे. पण ही आकडेवारी अनेकदा सूचक ठरू शकते. तर  सुप्रियांसाठी फक्त २००९ ची त्यांची पहिली निवडणूक सोपी होती. त्यानंतरच्या निवडणुका अवघडच होत्या.  आता त्यांच्या चौथ्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या त्यांच्याविरोधात उमेदवार असतील, असे जवळपास नक्की झाल आहे. सुळे आणि सुनेत्रा ही नणंद-भावजय यांच्यातील काॅंटे की टक्कर देशाला पाहावयाला मिळणार आहे.

सुळे यांच्या तीन निवडणुकांतील विजयाकडे नजर मारली तरी काही बाबी स्पष्ट होतील.  सुळे यांचे मताधिक्य २००९ च्या लोकसभा निवडणकीत तीन लाख ३६ हजार होते. मात्र २०१४ च्या मोदी लाटेत महादेव जानकर यांनी कडवी लढत दिली. तेव्हा त्या फक्त ७० हजाराच्य फरकाने निवडून आल्या. जानकर यांचे तेव्हा चिन्ह कपबशी होते. त्याऐवजी त्यांनी कमळ चिन्ह घेतले असते तर सुळेंचा तेव्हाच पराभव झाला असता, अशी चर्चा या निकालावर झाली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कांचन कुल यांनी सुळेंना आव्हान दिले. त्या वेळी सुमारे १ लाख ५५ हजारांची आघाडी घेत सुळेंनी हॅटट्रीक साधली. हे विजय अजितदादा हे सुळेंसोबत असताना झाले होते. आता तेच विरोधात आहेत. हीच मोठी अडचण सुळेंसाठी आहे.

सुळेंसाठी हे राजकीय गणित कसे आहे, हे आधी समजून घेऊ या!

या लोकसभा मतदारसंघात बारामती, इंदापूर, दौंड, खडकवासला, भोर आणि पुरंदर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.  शरद पवार यांनी शेकडो वेळा या मतदारसंघातील गावांचा दौरा केला आहे. अनेक घरांशी शरद पवारांचा संपर्क आहे. हा संपर्क सुप्रिया सुळे यांनीही कायम ठेवला. या साऱ्याला अजित पवार यांचीही जोड होती. मात्र अजित पवार हे स्वतंत्र झाल्याने सुळेंसमोरील अडचणी वाढल्या आहेत. पवारांचे कार्यकर्ते विभागले गेले आहेत. काही विधानसभा मतदारसंघात अजित पवार हे सुळेंना वरचढ ठरू शकतात.

 

हक्काची बारामती कोणाची?

सुळे यांच्या तीनही निवडणुकांत बारामती विधानसभा मतदारसंघाने  त्यांना दर वेळी एक लाखांहून अधिक मतांची आघाडी दिली. ही आघाडी  भरून काढणे विरोधी उमेदवाराला कधीच शक्य होत नाही. सुळेंच्य विजयाचा खरा पाया हा बारमती विधानसभा मतदारसंघातच घातला जातो. सुळेंच्या या मताधिक्यांसाठी अजित पवार हेच आतापर्यंत प्रयत्न करत होते. पण आता तेच सुळेंच्या विरोधात आहेत. सुळेंना  बारमतीतून मताधिक्य मिळविणे पहिल्यासारखे सहज व सोपे नाही. शरद पवार की अजित पवार यांचा करिश्मा या निवडणुकीत चालणार, यावर सारा खेळ ठरणार आहे. सुळे बारामतीतून पिछाडीवर राहिल्या तर त्यांच्यासाठी तो धक्का आणि धोका दोन्हीही ठरेल. महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काॅंग्रेस या दोन्ही पक्षांची ताकद बारामतीत नगण्य आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या  मतांची मोठी रसद त्यांना मिळू शकत नाही.

इंदापूर आणि दौंडमध्ये सुळेंसाठी कोण काम करणार?

इंदापूर आणि दौंड या दोन्ही मतदारसंघातील परिस्थिती आणखी बिकट ठरणार आहे. इंदापूरमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची समान ताकद आहे.  इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे हे अजितादादांसोबत आहेत. भाजपची आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीची युत आहे. हर्षवर्धन पाटील विरुद्ध पवार घराणे अस ४० वर्षांचा संघर्ष आहे. शरद पवार असोत की अजितदादा या दोघांनीही त्यांना अनेकदा राजकीय झटके दिले आहेत. त्यामुळे सुळे किंवा सुनेत्रा पवार यांचे काम ते फार आनंदाने करतील असे नाही. पण ते आता भाजपमध्य असल्याने त्यांना पक्षाचा आदेश मानावा लागणार आहे. ते सुनेत्रा पवारांसाठीच काम करण्याची जास्त शक्यता आहे. त्यासाठी आपल्या पुढील राजकारणासाठी काही शब्द ते अजित पवारांकडून घेतील. आमदार भरणे, हर्षवर्धन असे प्रमुख नेते हे अजितदादांसोबत गेल्यानंतर सुळेंची मोठ कसोटी या मतदारसंघात लागणार आहे.

अशीच परिस्थिती दौंड मतदारसंघात आहे. या ठिकाणी भाजपच आमदार राहुल कुल हे महायुतीच्या उमेदवाराचे म्हणजे सुनेत्रा पवारांच काम करणार आहे. राष्ट्रवादीच दुसरे प्रमुख नेते रमेश थोरात हे अजितदादांसोबत आहेत. कुल आणि थोरात या दोन नेत्यांभोवतीच दौंडचे राजकारण फिरते. या पैकी एकाचीही साथ सुळेंना मिळणार नाही. या दोन्ह मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद फारशी नाही. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातून  मताधिक्य मिळविणे सुळेंसाठी कठिण राहील.

भोर आणि पुरंदरवर सुळेंना विश्वास

सुळेंसाठी भोर आणि पुरंदर हे दोन मतदारसंघ मदतीचा हात देणारे ठरतील. दोन्ही ठिकाणी काॅंग्रेसचे आमदार आहेत. शरद पवार यांना मानणारा वर्गही आहे. पुरंदरमध्ये आमदार संजय जगताप, पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना हे कागदोपत्री वरचढ वाटतात. माजी मंत्री विजय शिवतारे हे अजितदादांसोबत असतील. भाजपची फारशी ताकद या मतदारसंघात नाही. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी हा मतदारसंघ अनुकूल राहील. य साऱ्या समीकरणांत एक धोका सध्या चर्चिला जात आह. तो म्हणजे आमदार संजय जगताप हेच भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांनी ऐनवेळी काॅंग्रेसची साथ सोडली तर मग सुळेंसाठी येथून मताधिक्य मिळविणे कठिण होईल.

भोरमध्ये काॅंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांची ताकद आहे. या मतदारसंघातील इतर तालुक्यांत सुळे यांनी सातत्याने संपर्क ठेवला आहे. शिवसेनेचीही येथे हक्काची मते आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुळेंना येथे आघाडी मिळू शकते. पण जे दुखणे हर्षवर्धन पाटलांचे आह तेच थोपटे यांचेदेखील आहे. पवार कुटुंबाने दरवेळी राजकीय अडसर केल्याच थोपटे यांच गाऱ्हाणे असते. त्यांची मदत सुळेंना हवी असेल तर खुद्द शरद पवारांनाच येथे पुढाकार घ्यावा लागणार आहे. थोपटे हे देखील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा अधूनमधून उठत असते. पण त्यांनी आपली निष्ठा कायम ठेवली आहे. ही सुळेंसाठी फायदेशीर बाब आहे.

खडकवासला सर्वात अवघड मतदारसंघ

बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला हा विधानसभा मतदारसंघ सुप्रिय सुळे यांना नेहमीच अवघड राहिला आहे. २०१४ आण २०१९ या दोन्ही निवडणुकांत त्या येथून पिछाडीवर होत्या. २०१४ च्या निवडणुकीत जानकर यांनी येथून सुमारे २० हजार मतांची आघाडी घेतली होती. तर २०१९ मध्ये कांचन कुल यांनी तब्बल ६४ हजारांच्या फरकाने सुळेंना मागे ठेवले होते. सुळेंचा बारामतीतून पराभव करण्याचा भाजपचा खरा मार्ग खडकवासला मतदारसंघातून जातो. या मतदारासंघात भाजपची मोठी ताकद आहे. प्रत्येक निवडणुकीत खडकवासल्यातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून बारामतीत विजय मिळविण्याचे भाजपच धोरण आतापर्यत होते. आता अजितदादा भाजपच्या सोबतीला आहेत. त्यामुळे खडकवासल्यात सुळेंची मोठी कसोटी लागणार आहे.

 

ही सारी कागदावरची आकडेवारी पाहिली तर सुळेंसाठी ही निवडणूक सोपी नाही. पण प्रत्येक निवडणुकीचे गणित वेगळे असते. जेवढा संघर्ष मोठा तेवढा विजय देखील मोठा असू शकतो. पित्याच्या संघर्षात साथ देणारी मुलगी म्हणून सुळे सरसावल्या आहेत. सारे जवळचे सोडून गेले तरी मुलगी पित्यासोबत आहे, ही बाब मतदारांच्या भावनेला आवाहन करणारी ठर शकते. आता सुळेंसाठी ही भावना मोठी ठरणार की अजितदादांना ताकदीचे गणित विजय मिळवून देणार याची आता उत्सुकता आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube