१ जुलैचा मोर्चा म्हणजे ‘भीती मोर्चा’; मनिषा कायंदे यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

१ जुलैचा मोर्चा म्हणजे ‘भीती मोर्चा’; मनिषा कायंदे यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई : करोना केंद्रे उभारणी, जमीन खरेदी, रस्ते-बांधणी आदी सुमारे १२ हजार २४ कोटी रुपये खर्चाच्या मुंबई पालिकेच्या ७६ कामांची नियंत्रक व महालेखापरीक्षकांकडून (कॅग) चौकशीत उद्वव ठाकरेंच्या काळात गैरव्यवहार झालाचा ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान, यावरून आता विरोधक आमने-सामने येणार असल्याचं दिसतं. आता मुंबई महानगरापालिकेतील ठेवी संदर्भात शिंदे-फडणवीस सरकारला जाब विचारण्यासाठी ठाकरे गटाकडून १ जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. यावर शिंदे गटाच्या प्रवक्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी प्रतिक्रिया दिली. जर तुम्ही काही केले नसेल तर चौकशीला निडरपणे सामोरे गेलं पाहिजे. उबाठाचा १ जुलैचा मोर्चा हा भीती मोर्चा आहे, असा टोला त्यांनी लगावला. (The July 1 march is the ‘fear march’; Manisha Kayande attacked Thackeray)

पत्रकार परिषदेत बोलतांना मनिषा कायंदे म्हणाल्या, मुंबई महापालिकेच्या कामकाजातील अनियमिततेची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीमुळे उबाठा गटाचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे त्याच्याविरोधात महापालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारासंदर्भात हा मोर्चा असल्याचे सांगितले जात आहे. खरे तर हा भीती मोर्चा आहे. कॅगच्या अहवालवरून लक्ष हटवण्यासाठी हा मोर्चा काढला जात आहे.  जर तुम्ही काही केले नसेल तर चौकशीला निडरपणे सामोरे जाण्याची गरज आहे. चौकशी लावल्यावर पोटात भीतीचा गोळा का आला? भ्रष्ट्राचाराचा मुद्दा असेल तर मागील इतिहास देखील तपासावा लागेल, असा इशाराही कायंदे यांनी दिला.

सैन्यात भरती व्हायचंय! महाज्योती संस्थेकडून उमेदवारांना प्रशिक्षणासह विद्यावेतनही मिळणार 

त्या म्हणाल्या, महापालिकेच्या कामाची चौकशी लावली तर महापालिकेवर मोर्चा का काढावा लागतो याचा विचार करण्याची गरज आहे. कॅगचा अहवाल आल्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करु नये, अशी तुमची इच्छा आहे का? असा खोचक सवाल करत मुंबईकरांची दिशाभूल करु नका, असे त्या म्हणाल्या.

त्या म्हणाल्या, मुंबई महापालिकेच्या एफडी मोडल्याचा कांगावा उबाठा गटाकडून जाणिवपूर्वक केला जात आहे. जनतेला याच मुद्द्यात गुंतवून ठेवले जात आहे. एफडी वापरल्या तरी त्यामध्ये वाढ करुन ७७ हजार कोटी वरुन ८८ कोटी वर आणल्या. आम्ही हा निधी घाण पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी वापरला.  यापूर्वी शहरातील घाण पाणी तसेच समुद्रात थेट सोडले जात होते. स्वतःला पर्यावरणवादी समजणारे व किनारपट्टी स्वच्छ करण्याचा केवळ फोटोजेनिक इव्हेंट करण्यात मर्दुमकी समजणाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले, असा टोला नाव न घेता त्यांनी आदित्य ठाकरेंना लगावला.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube