राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार : रोहित पवार यांना लागली चाहूल
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सत्तासंघर्षाची जोरदार चर्चा सुरू आहे. तत्कालीन महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील मंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) काही आमदारांसह गुवाहाटीला गेले होते. महाविकास आघाडी सरकार पडण्याचे प्रमुख कारण हे आमदारांची नाराजी हे होते. त्यातच आता शिंदे फडणवीस सरकारमध्ये आमदार नाराज असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे.
महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा सत्तेत होतं तेव्हा ते कधी पडणार याच्या तारखा वारंवार भाजपकडून दिल्या जात होत्या. महाविकास आघाडीने तरीही अडीच वर्षे पूर्ण केली. त्यानंतर राज्यात शिंदे फडणवीस सरकार आलं. शिवसेनेतून बंड केलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. दरम्यान, सध्या महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सध्या सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी सुरू आहे. येत्या काही दिवसांत त्यावर निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा स्थितीत रोहित पवारांनी केलेल्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
रोहित पवार यांनी ट्विट करत यावर भाष्य केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, भूकंपापूर्वी प्राणी आणि पक्षांचं वर्तन बदलत असतं. एकप्रकारे ती भूकंपाची पूर्वसूचनाच असते. असंच एक वेगळ्या प्रकारचं माझं आजचं निरीक्षण आहे. सत्ताधारी पक्षातील अनेक सहकारी आमदारांची आज कामानिमित्त मुंबईत असताना भेट झाली असता काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. या आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि बॉडी लँग्वेज पडलेली होती. सत्ताधारी असूनही काही आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटता येत नसल्याचं समजलं. शिवाय अर्थ विभागातून विशिष्ट पक्षाच्याच फायली मंजूर होत असून त्याचा वेगही अचानक वाढल्याचं समजलं. ही कोणत्या भूकंपाची चिन्ह असावीत?, असं ट्विट रोहित पवारांनी केलं आहे. रोहित पवारांच्या ट्विटनंतर आता कोणता राजकीय भूकंप होणार? यावरुन चर्चेला उधाण आलं आहे.
भूकंपापूर्वी प्राणी आणि पक्षांचं वर्तन बदलत असतं…. एकप्रकारे ती भूकंपाची पूर्वसूचनाच असते…
असंच एक वेगळ्या प्रकारचं माझं आजचं निरीक्षण आहे..
सत्ताधारी पक्षातील अनेक सहकारी आमदारांची आज कामानिमित्त मुंबईत असताना भेट झाली असता काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या…— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 15, 2023
आव्हाड समर्थकांनी सहाय्यक आयुक्ताला चोपलं, ‘त्या’ कथित क्लिपमध्ये धमकावल्याचा आरोप