त्यांना आमचे प्रवक्ते उत्तर देतील, अजित पवार यांच्याकडून राणेंना टोला
मुंबई : अजित पवार यांनी विधीमंडळात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल स्वराज्यरक्षक असा उल्लेख केला होता. संभाजी महाराज धर्मवीर नव्हते असंही ते विधी मंडळात म्हणाले होते. पवारांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात विरोधकांकडून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. तर भारतीय जनता पक्षासह इतर संघटनांकडून आंदोलने करण्यात आली.
त्यावर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली, त्यावेळी ते म्हणाले की सध्या धर्मवीर नाव कोणीही कोणाला देतंय, तर काही जण चित्रपट काढत आहेत, धर्मवीर नाव कोणालाही देत आहेत. मात्र, स्वराज्यरक्षक दुसरं कोणाला म्हणता येणार नाही कारण, स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांसारखा दुसरा कोणी होऊच शकत नसल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितलं आहे.
दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या टीकेबाबत अजित पवार यांना विचारणा करण्यात आली. त्यावेळी अजित पवार यांनी टिल्ल्या लोकांनी असलं काही सांगायचं कारण नाही असे म्हटले. त्यांची उंची किती, त्यांची झेप किती? असे म्हणताना त्यांच्या आरोपांना पक्षाचे प्रवक्ते उत्तर देतील असे पवार यांनी म्हटले. अशा लोकांच्या नादी आपण लागत नाही, असेही अजित पवार यांनी आपल्या शैलीत म्हटले.