‘घटनाद्रोह्यांना सुतासारखे करायला तुम्ही हवे होता!’ बाळासाहेबांना मानवंदना देत ठाकरे गटाचा भाजपवर प्रहार

‘घटनाद्रोह्यांना सुतासारखे करायला तुम्ही हवे होता!’ बाळासाहेबांना मानवंदना देत ठाकरे गटाचा भाजपवर प्रहार

Uddhav Thackery : देशातील आजचे वातावरण निराश करणारे आहे. हे असेच सुरू राहिले तर एक दिवस देशात अराजक माजेल, असा इशारा बाळासाहेब ठाकरे देऊन गेले. तो इशारा खरा ठरताना दिसत आहे. देशात अराजकाचा स्फोट होईल पण लोकांना आधार देणारे बाळासाहेब नाहीत. एकेकाळी बाळासाहेब तळमळीने म्हणाले होते, ज्यांना देशाचे संविधान व कायदे मान्य नसतील त्यांनी सरळ कराची लाहोर गाठावे. बाळासाहेबांचा हा इशारा तेव्हाच्या धर्मांध मुसलमानांसाठी होता. आज आपलेच लोक संविधान व कायदे मानायला तयार नाहीत. या घटनाद्रोह्यांना सुतासारखे सरळ करायला बाळासाहेब, तुम्ही आज हवे होता! बाळासाहेब तुम्ही आज नाहीत पण तुम्हीच घडवलेली गरम रक्ताची पिढी शिवसेना व महाराष्ट्राची कवचकुंडलं बनून लढते आहे. ती लढत राहील. हीच तुम्हाला मानवंदना ! अशा शब्दांत उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहिली असून शिंदे गटावर प्रहार केला आहे.

Uddhav Thackeray : मोदी-शहांसाठी नियमात बदल केला का? उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन. त्यानिमित्त देशभरातील शिवसैनिक त्यांच्या स्मृतीस्थळावर येऊन आदरांजली वाहत आहेत. आज ठाकरे गटाने अग्रलेखातून त्यांना आदरांजली वाहत शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला.

महाराष्ट्राचे राजकारण हे भयंकर या शब्दाला साजेसे झाले आहे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अशा घोर काळात आपल्यात नाहीत. देशात लोकशाही, संसद, न्यायालये, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा आवळला जात आहे आणि अन्यायाविरुद्ध एल्गार पुकारणारे बाळासाहेब आपल्यात नाहीत. राज्यात जात विरुद्ध जात असा आरक्षणाचा भडका उडालेला आहे. त्या भडक्यात मराठी माणसांचे ऐक्य होरपळताना दिसत आहे. अशा वेळी जातीभेद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा असे सांगणारे बाळासाहेब आपल्यात नाहीत. मुंबईचे तर लचके तोडले जात आहेत.

Uddhav Thackeray : ‘आता ठाणेकरच गद्दारांना धडा शिकवतील’ उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

राज्यातले उद्योगधंदे गुजरात लॉबी पळवत आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानास चूड लावणारे दळभद्री राजकारण सुरू असताना मुंबईस हात लावाल तर नरडीचा घोट घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी गर्जना करून महाराष्ट्र द्वेष्ट्यांना दे माय धरणी ठाय करून सोडणारे बाळासाहेब आज नाहीत. पण त्यांनी दिलेला लढण्याचा विचार म्हणजेच धगधगती प्रेरणा आहे. बाळासाहेब फक्त शरीराने आपल्यात नाहीत पण त्यांनी निर्माण केलेल्या भव्य विशाल शिवसेनेच्या रुपाने ते महाराष्ट्राच्या कणात आणि मनामनात आहेत, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube