सिल्लोडमधील गुंडागर्दी संपवण्यासाठी…गद्दाराला पाडा; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आवाहन

सिल्लोडमधील गुंडागर्दी संपवण्यासाठी…गद्दाराला पाडा; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आवाहन

Uddhav Thackeray Sabha For Suresh Bankar : विधानसभा निवडणुकीसाठी सिल्लोड (Sillod) मतदारसंघात ठाकरे गटाकडून सुरेश बनकरांना (Suresh Bankar) उमेदवारी देण्यात आलीय. त्यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मैदानात आहेत. आज सिल्लोडमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, अनेकजण गर्दी जमवण्याचा प्रयत्न करतात. काल देखील मुंबईत खुर्च्यांची गर्दी खूप जमली पण माणसंच नाही आली, अशी टीका ठाकरेंनी विरोधकांवर केलीय. या ठिकाणी जमलेली गर्दी हुकुमशाही, दडपशाही गाडून टाकायला आली असल्याचं देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, सिल्लोडमधील गद्दाराने टीव्ही कॅमेऱ्यासमोर सुप्रियाताईंना शिवीगाळ केली. हाच माणूस उमेदवार आहे. त्याच्या प्रचाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी सभा (Assembly Election 2024) घेतात. ही व्यक्ती त्यांच्या व्यासपीठावर आहे. त्यावरून मला मोदींना असा प्रश्न विचारायचा आहे, हेच तुमचं हिंदुत्व आहे का? हीच तुमची संस्कृती आहे का? लोकसभा निवडणुकीत प्रज्वल रेवण्णा यांचे हात बळकट करा, असं म्हटलंय. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही गोरगरिबांच्या झोपा उडवल्या आहेत. स्वत:ची मालमत्ता भरपूर करून ठेवली असल्याची टीका त्यांनी विरोधकांवर केलीय.

Uddhav Thackeray : महाविकास आघाडीचं ठरलं, उद्धव ठाकरे हेच प्रचारप्रमुख?

उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्हाला पुन्हा सिल्लोडमध्ये गुंडागर्दीचं म्हणजे भाजपचं राज्य पाहिजे आहे का? आपण सगळे एकत्र येवून ही गुंडागर्दी मोडून काढू या. मी वचन देतो की, सरकार आल्यानंतर मी तुम्हाला सोयाबीनला सात हजार रूपये भाव देईन. गद्दाराला पन्नास खोके मिळत असतील तर राबराब मिळणाऱ्या मजुराला त्याच्या कष्टायची किंमत का मिळू नये, असं ठाकरे म्हणाले आहेत. महिलांना दिले जाणारे पंधराशे रूपये मिंधे स्वत:च्या खिशातून नाही आणत. हे शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी महिला पोलीस असणारी पोलीस स्टेशन देखील महाराष्ट्रात बांधणार असल्याचं ठाकरे म्हणाले आहेत.

Uddhav Thackeray : विधानसभेसाठी ठाकरेही तयार, ‘या’ उमेदवारांना थेट एबी फॉर्मचं वाटप

आपण गद्दार नाही आहोत. पैशाचा महापूर नाहीय, माझ्याकडे जीवाभावाची जनशक्ती आहे. ज्याप्रमाणे मुलींना मोफत शिक्षण दिलं जातंय त्याचप्रमाणे महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलांना मोफत शिक्षण देणार आहे. आपल्या देशाचं संविधान वाचवण्यासाठी आपण कल्याणरावांना खासदार केलंय. तुम्हाला वचन दिलेल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी सुरेश बनकर आमदार पाहिजेत. या सिल्लोडमधील गुंडागर्दी संपवण्यासाठी मला बनकर आमदार पाहिजेत. एकदा गद्दाराला पाडा, असा गाडा की याचा पापाचा पाढा तुरूंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. ही निवडणूक तुमचं आयुष्य कोणाच्या हातात देणार आहात, याची असल्याचं ठाकरे म्हणाले आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube