१५ हजारांचे ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली; वडेट्टीवारांची टीका

Vijay Wadettiwar : भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तान (Pakistan) आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर पाकने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला. भारताने पाकचे हल्ले परतून लावले. दरम्यान, याबाबतच आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मोठं विधानं केलं. १५ हजारांचा चायनिज ड्रोन (Chinese drones) पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली, अशी टीका त्यांनी केली.
अभिनेत्रीचा अंडरवर्ल्डच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न फेल, गँगस्टरने तिला हॉटेलमध्ये…
आज विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, ऑपरेशन सिंदूरमध्ये आपलं किती नुकसान झालं आहे, आपली किती जीवितहानाी झाली आहे, आपल्या किती सैनिकांचं नुकसान झालं आहे, आपल्या किती राफेलचं नुकसान झालं आहे, याची माहिती मिळाली पाहिजे.
ते म्हणाले, पुलवामा हल्ल्यावेळी २५० किलो आरडीएक्स कुठून आले? ते कोणी आणले? ते आणणारे कोण होते? याचा शोध अद्याप लागला नाही. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. आपण सीमापार लढाई केली, पण भारतात लपलेल्या या अतिरेक्यांचा शोध लागला नाही. आम्ही याविषयी प्रश्न विचारला तर आम्हाला देशद्रोही ठरवलं जातं. आमच्यावर सैन्याचा अवमान केल्याचा आरोप केला जातो. पण, या देशात तिरंग्याचा सर्वाधिक अपमान करणारे कोण आहेत? हे सर्वश्रूत आहेत. त्यामुळं आम्ही तिरंगा रॅलीद्वारे सैनिकांच्या शौर्याला सलाम करतो, असं ते म्हणाले.
पाकिस्तानने ५ हजार चिनी बनावटीच्या ड्रोनने भारतावर हल्ला केला. त्यांच्या एका ड्रोनची किंमत १५ हजारांच्या आसपास आहे. हे एक ड्रोन पाडण्यासाठी आपण १५ लाख रुपयांचे क्षेपणास्त्र डागले. आता यामागे चीनचे डावपेच असल्याचा दावा केला जात आहे. मला वस्तुस्थिती माहित नाही. पाकने आपली चार राफेल विमाने पाडल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणी स्थिती स्पष्ट करण्याची गरज आहे. युद्धानंतर स्थिती स्पष्ट करण्यात काही कमीपणा किंवा चुकीचं आहे, असं मला वाटत नाही.
या मोहिमेदरम्यान सरकारने काय निर्णय घेतले? किती खर्च केला आणि त्याचे परिणाम काय झाले, हे जाणून घेण्याचा जनतेला अधिकार आहे. सरकारने या संदर्भात स्पष्ट उत्तर देण्याची मागणीही वडेट्टीवार यांनी केली.