Balasaheb Thorat : सत्यजीतची निवडणूक झाली… मामा, आता तरी बोला!

  • Written By: Published:
Balasaheb Thorat : सत्यजीतची निवडणूक झाली… मामा, आता तरी बोला!

पुणे : नाशिक पदवीधर विधान परिषद मतदारसंघातीलन (Nashik Graduate constituency election) निवडणुकीचा निकाला लागला. पण या निवडणुकीच्या नाट्यावरचा पडदा अद्याप उघडलेला नाही. काॅंग्रेसची उमेदवारी मिळालेल्या डाॅ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी अर्ज न भरणे, त्यांचा मुलगा सत्यजीत (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष अर्ज दाखल करणे अशा घडामोडी घडल्या. त्यांनी ना भाजपमध्ये प्रवेश केला ना भाजपने त्यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला. पण तांबे हे भाजपशी जवळीक साधून होते, हे मतदानाच्या दोन दिवस आधी स्पष्ट झाले. काॅंग्रेसने तांबे पिता-पुत्रावर निलंबनाची कारवाई पण केली. या साऱ्या गदारोळात काॅंग्रेसचे नेते आणि सत्यजीत तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी मौनात राहणे पसंत केले. त्यांनी गेल्या वीस दिवसांत ना कोणाशी संपर्क साधला ना कोणती कृती केली. त्यांना काही खेळ्या खेळल्या असतीलही पण त्या पडद्याआडून झाल्याची शक्यता आहे. या प्रचंड घडामोडींपासून ते अलिप्त राहिले. त्यामुळे त्यांची भूमिका नक्की कोणती, याचा उलगडा झाला नाही. आता निवडणूक संपल्यानंतर तरी ते याविषयी भाष्य करणार का, याची उत्सुकता आहे.

नाशिक विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी या घडामोडी झाल्या. पण सत्यजीत तांबे हे वेगळा विचार करण्याची शक्यता त्या आधीपासूनच व्यक्त होत होती. तसे वृत्तही `लेटस अप`ने दिले होते. तरीही तांबे घराणे हे काॅंग्रेसशी एकनिष्ठ असल्याने ते पक्षाच्या विरोधात जातील, यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता. त्यात काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुधीर आणि सत्यजीत तांबे या दोघांच्याही नावे पक्षाच्या अधिकृत उमेदवारीसाठीचा एबी फाॅर्म दिल्याचे सांगितले होते. कोण हा फाॅर्म कोरा होता, असे म्हणत कोणाचे नाव टाकायचे याचा निर्णय तांबे यांनी करायचा होता, असे सांगितले होते. पण शेवटी सत्यजीत यांना अपक्ष अर्ज भरला.

या साऱ्या गदारोळात बाळासाहेब थोरात कुठे, असाच प्रश्न प्रत्येक जण विचारत होता. अशोक चव्हाण यांनी तर थोरात हे आपला फोन उचलत नाहीत, असे जाहीरपणे सांगितले होते. नाशिकचा उमेदवार ठरविण्याचे सर्वाधिकार बाळासाहेब थोरात यांना होते, असे पटोलेंनी ठामपणे सांगितले. तरीही मग थोरात यांची अडचण काय होती, याचा उलगडा झाला नाही. विधीमंडळाच्या नागपूर येथील अधिवेशनात डिसेंबरमध्ये थोरात यांना छोटासा अपघात झाला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले. ते आजारी असल्याने ते निवडणुकीत नाहीत, असे त्यांचे समर्थक सांगत होते. पण ते आपली भूमिका स्पष्ट करणारे पत्रक काढू शकत होते. सोशल मिडियांतून योग्य तो संदेश देऊ शकले असते. पण त्यांनी ते केले नाही.

याबाबत अनेक तर्क मांडण्यात येत आहेत. अर्थात हे तर्कच आहेत. त्यावर बाळासाहेब थोरात हेच स्पष्टपणे सांगू शकतील.

तर्क १) सत्यजीत यांच्या उमेदवारीला थोरात यांचा विरोध होता. त्यामुळे काॅंग्रेसची उमेदवारी ही सुधीर तांबे यांनीच घ्यावी म्हणून बाळासाहेबांनी त्यांचेच तिकिट निश्चित केले होते. पण सत्यजीत यांनी ऐकले नाही आणि अर्ज भरला.

२)थोरात हे काॅंग्रेस पक्षात नाराज आहेत. त्यांनी सत्यजीत यांना पुढे करून त्यांनी आपल्या भाजप प्रवेशाचा मार्ग खुला केला. त्यामुळे त्यांनी या निवडणुकीत अलिप्त राहण्याची भूमिका बजावली. २०२४ च्या निवडणुकीच्या वेळी थोरात आणि तांबे दोघेही भाजपमध्ये असतील.

३)सत्यजीत यांनीच पक्षातून बाहेर जावे, असे थोरात यांना वाटत असावे. थोरात हे यापुढे काॅंग्रेसमध्येच राहतील. आता संगमनेरमधून त्यांच्या कन्या डाॅ. जयश्री थोरात या विधानसभेच्या उमेदवार असतील. बाळासाहेब हे राज्यसभेवर जाण्याच्या प्रयत्नात आहेत.

४)थोरात यांना तांबे कुटुंबीयांना दुखवायचे नव्हते. तुम्ही तुमचा निर्णय घ्या, असा पवित्रा घेतला आणि शांत बसले.

५)थोरात अडचणीत यावे, असे काॅंग्रेस पक्षातील इतर नेत्यांना वाटत होते. त्यामुळे सत्यजीत यांना उमेदवारी द्या, असे बाळासाहेबांनी सांगूनही त्यांनी सुधीर तांबे यांनाच उमेदवारी काॅंग्रेस पक्षाने दिली.त्यामुळे बाळासाहेब नाराज झाले आणि शांत बसले.

६)थोरात आणि तांबे यांनी एकत्रितपणे ही खेळी केली. सत्यजीत हे काॅंग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढले असते तर भाजप त्यांच्याविरोधात उमेदवार देणार. तो उमेदवार विखे किंवा इतर तगड्या घराण्यातील अस शकतो. निवडणुकीत कोणताही धोका होऊ नये म्हणूनच सत्यजीत यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आणि बाळासाहेबांनी त्यांना मूक संमती दिली. आता दोघेही काॅंग्रेसमध्येच राहतील.

७)सत्यजीत तांबे हे २०२४ मध्ये भाजपकडून संगमनेरमध्ये निवडणूक लढविणार, हे आधीपासूनच बाळासाहेबांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी नाराजीचा संदेश तांबे कुटुंबीयांना दिला.

आता या प्रश्नांवर थोरात काय उत्तर देणार याची प्रतिक्षा आहे. सत्यजीत तांबे हे चार फेब्रुवारी म्हणजे शनिवारी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यानंतरच बाळासाहेब बोलण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube