प्रकाश आंबेडकरांना दूर ठेवणं, ही महाविकास आघाडीची घोडचूक ठरणार?
प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) राजकारणातील विविध प्रयोग सातत्याने करणारे नेतृत्व. पुढारलेल्या जाती वगळून संख्येने कमी असलेल्या जातींना सोबत घेत आपली स्वतंत्र वाटचाल त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात कायम ठेवली आहे. यश मिळो अथवा न मिळो सातत्याने प्रयोग करत असतात. भाजपविरोध हा त्यांचा मूळचा अजेंडा. या अजेंड्याच्या विरोधात काॅंग्रेससोबत जाण्याची त्यांची या वेळी मनापासून तयारी आहे. पण मोदी लाटेत अगदी काठावर आलेली काॅंग्रेस अजूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करते आहे.
भाजपविरोधात विरोधकांची एकजूट करण्यासाठी काॅंग्रेस नेते धडपडत आहेत. या प्रयत्नांत ते आंबेडकर यांना सहभागी करून घेत नाही. दुसरीकडे आघाडीसाठी आंबेडकर दोन पावले पुढे येत आहेत. आपल्या पक्षाच्या मेळाव्याला त्यांनी राहुल गांधींना निमंत्रण दिले. त्या आधी उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांनी आणाभाका घेतल्या. तरीही भाजपविरोधातील इंडिया आघाडीत आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) अद्याप स्थान नाही.
आंबेडकरांची ताकद किती आहे?
वंचितचा राज्यात दबदबा आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल २४ लाख मते वंचितने मिळवली होती. एकूण मतसंख्येच्या चार टक्के मते त्यांना मिळाली. त्याचा फटका काॅंग्रेसला आणि राष्ट्रवादीला बसला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि ओवेसी यांच्या एमआयएमची युती झाली होती. या युतीने ३६ लाख मते घेतली. एमआयएमचे उमेदवार इम्तिआज जलील हे खासदार झाले. खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर आणि अकोला या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. सोलापुरात त्यांना सुमारे एक लाख ७० हजार मते मिळाली. या मतांमुळे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला. अकोल्यात आंबेडकर दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना दोन लाख ४४ हजार मते मिळाली होती. ही मते दुर्लक्ष करण्यासारखी नाहीत.
इंडिया आघाडीत भाजपकडून फूट पाडण्याचा प्रयत्न, खरगेंचं मराठीत खणखणीत भाषण
ठाकरे- आंबेडकर यांच्या युतीचे काय झाले?
प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी सर्वात आधी दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा केली. महाविकास आघाडीतील दोन्ही काॅंग्रेसला न विचारताच ही घोषणा झाली होती. पण या युतीचे पुढे काहीच झाले नाही. ना जागावाटपाची चर्चा ना दोन्ही नेत्यांच्या एकत्रित सभा. शिवसेना कट्टर हिंदुत्ववादी म्हणून आपला अजेंडा आतापर्यंत पुढे नेत होती. त्यात आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. त्यावरून दोन्ही पक्ष एकमेकांपासून दूर गेले. आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार मी राज्यातील दंगली टाळण्यासाठी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती. पण त्यामुळे शिवसेना हादरली आणि आंबेडकर यांच्यापासून अंतर ठेवू लागली.
काॅंंग्रेसला आंबेडकरांबद्दल विश्वास का वाटत नाही?
आंबेडकरांच्या राजकीय भूमिकांबद्दल काॅंग्रेसला नेहमीच संशय वाटत आला आहे. आंबेडकर सुरवातीला चर्चेला तयार होतात. पण नंतर आपल्या मागण्यांची संख्या वाढवत नेतात. तसेच त्यांचा इगो हा देखील काॅंग्रेसच्या स्थानिक नेत्यांसाठी अडचणीचा होऊन बसतो. २०१९ मध्ये आंबेडकरांना सोबत घेण्याचे ठरत होते. पण आंबेडकर यांनी सोनिया किंवा राहुल गांधी यांच्याशीच आपण चर्चा करणार, अशी भूमिका घेतली होती. काॅंग्रेस सातत्याने ज्या जागांवर पराभूत होत आहे, अशा जागा आपण मागत असल्याचे आंबेडकर सांगतात. पण नंतर अचानक काॅंग्रेसच्या मोक्याच्या जागांची मागणी करून खिंडीत गाठतात, असा अनुभव काॅंग्रेसला आहे. तसेच ते ऐनवेळी युती मोडल्याची घोषणा करून ते पक्षाला अडचणीत आणतील, अशीही भीती वाटते. या साऱ्या कारणांमुळे काॅंग्रेस अजूनही आंबेडकरांना प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे.
शरद पवार यांची भूमिका तळ्यात-मळ्यात
शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांचे सुरवातीपासून फारसे सख्य नाही. पण राष्ट्रवादीची शकले झाल्यापासून पवारांनाही दलित मतांचा आधार हवा आहे. महाविकास आघाडीला दलितांची आणि इतर छोट्या जातींची चार-पाच टक्के मते महत्वाची आहेत. त्या सध्या तरी शरद पवार हे आंबेडकरांना महाविकास आघाडीत घेण्यासाठी तयार असल्याचे दाखवत आहेत. प्रत्यक्षात पुढे काही घडत नाही. पवारांनी आपल्या विरोधात नेहमीच राजकीय भूमिका घेतल्याचा आंबेडकरांचा आरोप असतो. हे दोन नेते लोकसभा निवडणूक जवळ आली तरी अद्याप प्रत्यक्ष भेटलेले नाहीत.
रामराजे निंबाळकर-मोहिते पाटलांची ‘टाईट फिल्डिंग’; माढ्यात रणजितसिंहांचा गेम होणार?
जागावाटपचा पेच असा आहे…
प्रकाश आंबेडकर यांनी आपली लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढविणार आहेत. जागावाटप ठरायच्या आधीच आंबेडकरांनी आपली उमेदवारी जाहीर करणे हे महाविकास आघाडीतील नेत्यांना आवडले नाही. महाविकास आघाडीतील शिवसेनेशी आंबेडकरांनी युती केली आहे. मग शिवसेनेच्या कोट्यातूनच तुम्ही जागा घ्या, असेही हे नेते आंबेडकरांना सांगत असतात. उद्धव ठाकरे यांची शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस या तीन पक्षांत सर्वाधिक मोठा पक्ष कोणता, याचा वाद सुरू आहे. शिवसेनेला लोकसभेच्या ४८ पैकी २३ जागा हव्या आहेत. काॅंग्रेसला आपणच मोठे आहोत, त्यामुळे सर्वाधिक जागा आपल्याला हव्या असल्याचा आग्रह त्यांनी धरला आहे. यात राष्ट्रवादीला आपले आहे ते बळ टिकवायचे आहे. या तिन्ही पक्षांतच सुसंवाद सुरू नसल्याने आंबेडकरांचा कोणी घ्यायचा, हे ठरत नाही.
आंबेडकर स्वतंत्र लढले तर..
आधी म्हटल्याप्रमाणे आंबेडकरांची ताकद ही राज्यात चार चे पाच टक्के मते मिळविण्याची आहे. सोलापूर, अकोला, नांदेड, औरंगाबाद, दक्षिण-मध्य मुंबई या पाच मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला मिळणारी मते निर्णायक ठरू शकतात. आंबेडकरा यांना एक-दोन जागा देण्याचा विचार महाविकास आघाडी करू शकते. पण त्यांची मागणी ही चार किंवा पाच जागांची राहू शकते. महाविकास आघाडीने ती मागणी मान्य केली नाही तर आंबेडकर पुन्हा स्वतंत्रपणे लढतील. तसे घडले तर भाजपच्या ते पथ्यावर पडेल. भाजपविरोधी मतांमध्ये फूट पडून काही जागांवर महाविकास आघाडीला फटका बसू शकतो.
एकूणच आंबेडकरांना सोबत घेण्यावरून महाविकास आघाडीच संभ्रमात आहे. भाजपविरोधातील मतांची जुळणी करण्यात प्रत्येक महत्वाचे ठरू शकते. पण आंबेडकरांशी चर्चा कोणी आणि कशी करायची, याचा पेच सुटत नाही.