आनंदराज यांची ताकद किती? शिंदेंनी त्यांना महत्त्व का दिले!

Eknath Shinde And Anandraj Ambedkar Yuti : प्रकाश उर्फ बाळासाहेब, आनंदराज (Anandraj Ambedkar), भीमराव हे तिघेही भाऊ घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू. तिघेही आंबेडकरांचा राजकीय, वैचारिक वारसा पुढे चालवतायत. परंतु तिघांचे पक्ष, संघटना वेगळ्या. तिघेही वेगवेगळ्या मार्गाने आंबेडकरी समाजासाठी लढतात. परंतु आता आनंदराज आंबेडकर यांनी एक वेगळा राजकीय निर्णय घेतलाय. त्यांच्या रिपब्लिकन सेनेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde )यांच्या शिवसेनेबरोबर युती केलीय. शिवशक्ती व भीमशक्ती एकत्र आल्याचे जाहीर करून टाकले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युती झाली. पण आनंदराज आंबेडकरांची ताकद किती आहे ? या युतीवर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले, त्यांनी काय निर्णय घेतलाय हेच या व्हिडिओतून पाहुया…
1996 ची एकजूट ते दात नसलेले वाघ…
तसं पाहिलं तर दलित चळवळीच्या नेत्यांमध्ये फाटाफूट झालेली आहे. ते एकत्र कधी-कधीच येतात. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये वेगवेगळे गट पडले होते. परंतु 1995 मध्ये हे गट एकत्र आले. पुढे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रयत्नामुळे या गटाने काँग्रेसबरोबर आघाडी केली. रा. सू. गवई, जोगेंद्र कवाडे, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले हे चौघेही जनतेतून खासदार झाले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासाठी हा एकप्रकारे सुवर्णकाळ होता. परंतु हा काळ काही वर्षांसाठीच होता. त्यानंतर सर्वजणांनी वेगळे मार्ग निवडले. त्याचा राजकीय फटकाही त्यांना बसत गेला. दात नसलेले वाघ अशी त्यांची अवस्था. सध्या रामदास आठवले भाजपमध्ये असून ते राज्यसभेचे खासदार, केंद्रीय मंत्री आहेत. परंतु राज्यात त्यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आठवले) मात्र राजकीय स्थानच नाही. (
Eknath Shinde And Anandraj Ambedkar Yuti)
लोकसभेला तिघेही रिंगणात, दोघांचे डिपॉझिट जप्त
2024 लोकसभा लोकसभा निवडणुकीला तिघेही लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे अकोला, अमरावती या राखीव लोकसभा मतदारसंघातून आनंदराज आंबेडकर हे उभे होते. वंचितचा त्यांना पाठिंबा होता. तर तिसरे बंधू भीमराव आंबेडकर हे थेट पंजाबमधील होशियारपूर या राखीव मतदारसंघातून उभे राहिले होते. ग्लोबल रिपब्लिकन पक्षाकडून ते उमेदवार होते. प्रकाश आंबेडकर हे वगळता दोघेंचहेी डिपॉझिट जप्त झाले. भीमराव आंबेडकर यांना अवघ्या 1 हजार 41 मते मिळाल होती. प्रथमच लोकसभेच्या रिंगणात उतरलेले आनंदराज यांना 19 हजाराच मते मिळाली होती. तर प्रकाश आंबेडकर यांना पावणे तीन लाख मते मिळाली होती. आनंदराज हे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आहेत. तर भीमराव हे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे अध्यक्ष आहेत.
आंबेडकरी जनता कुणाच्या पाठीशी ?
तसं पाहिलं तर प्रकाश आंबेडकर हे राजकारणात पॉवरफूल आहेत. ते राज्यसभेचे खासदार राहिलेले आहेत. दोनदा अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. त्यांनी राजकारणात वेगवेगळे प्रयोग केलेत. भारीप बहुजन महासंघ स्थापन करून राजकारण केले. स्थानिक पातळीवर त्यांनी राजकारण केले. अकोला येथील जिल्हा परिषदही त्यांना ताब्यात घेतली होती. तर वंचित बहुजन आघाडीची स्थापना करून सर्वच घटकांना बरोबर घेतले. 2019 साली त्यांनी एमआयएमला बरोबर घेऊन आपली व्होट बँक तयार केली. वंचित बहुजन आघाडीला यश आले. संभाजीनगरमधून इम्तियाज जलील हे खासदार झाले. परंतु सर्व लोकसभा जागा लढून त्यांना केवळ संभाजीनगरची जागा जिंकता आली. स्वतःचे ते अकोला आणि सोलापूर दोन मतदारसंघातून पराभूत झाले. त्या लोकसभेला 36 लाख मते वंचितला मिळाली होती. परंतु विधानसभाला हे यश त्यांना राखता आले नाहीत. विधानसभा कमी मते मिळाली. पण 2024 च्या लोकसभा व विधानसभेला अपेक्षित मते मिळू शकले नाहीत. परंतु प्रकाश आंबेडकरांना लोकसभेला मिळालेली मते बघता अजूनही आंबेडकरी, दलित जनता त्यांच्याबरोबर दिसून येत आहे.
आनंदराज आंबेडकर यांची ताकद किती ?
आता पाहुया आनंदराज आंबेडकर यांची ताकद. आनंदराज आंबेडकर हे तसे 1998 पासून प्रकाश आंबेडकर यांच्यापासून दूर गेलेले आहेत. त्यांचा रिपब्लिकन सेना नावाचा राजकीय पक्ष आहे. ते त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. ते यंदाच अमरावतीतून लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. मोठा भाऊ प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा असून ते डिपॉजिटही वाचवू शकले नाहीत. आनंदराज आंबेडकर हे तसे राजकारणात जास्त सक्रीय दिसून येत नाहीत. राज्यभरात त्यांच्या कार्यकर्त्यांचे जाळेही नाही. आनंदराज आंबेडकर यांची राजकीय ताकद नाही. आनंदराज आंबेडकर व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकत्र येण्याने फार राजकीय परिणाम दिसून येणार नाहीत, असे मत ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांचे आहे.
आनंदराज आंबेडकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर गेल्यानंतर त्यांच्याबरोबर सर्व राजकीय संबंध प्रकाश आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीने तोडले आहेत. रिपब्लिकन सेनेशी सर्व संबंध तोडले आहेत. यापुढे त्यांना कोणताही पाठिंबा दिला जाणार नसल्याचं स्पष्ट वंचित बहुजन आघाडीने म्हटलंय.
महाराष्ट्रात प्रचंड मोठा आंबेडकरी समाज आहे. जो आतापर्यंत अनेक वर्ष रस्त्यावर लढाई लढत आला. त्या कार्यकर्त्याला आतापर्यंत काही मिळालं नाही. या कार्यकर्त्याला सध्याच्या होणाऱ्या स्थानिक निवडणुकांमध्ये आंबेडकरी कार्यकर्त्याला सत्तेचा लाभ मिळावा, यासाठी आम्ही दोघांनी एकत्र यायचं ठरवलंय, असं आनंदराज आंबेडकर यांचं म्हणणं आहे. परंतु प्रत्यक्षात निवडणुकीत शिवशक्ती व भीमशक्तीला युतीला लोक किती स्थान देतात हे येत्या काही दिवसांत दिसेलच.