झेडपीत घराणेशाहीचा कहर; सोलापूर, पुण्यात नेत्यांच्या घरातच तिकीट !

Zilla Parishad Election: आता झेडपी, (Zilla Parishad Election) पंचायत समितीच्या निवडणुकीत घराणेशाहीनं पुढचं पाऊल टाकलंय.

  • Written By: Published:
Zilla Parishad Election

Zilla Parishad Election: महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकीत आपण जोरदार घराणेशाही पाहिली. आमदार, खासदारांचे मुले, पुतणे, मुली, सुना या निवडणुकीत आपलं नशिब अजमावलं. काही जणांना मतदारांनी स्वीकारलं. तर काही जणांना मतदारांनी घरी बसवलं. आता झेडपी, (Zilla Parishad Election) पंचायत समितीच्या निवडणुकीत घराणेशाहीनं पुढचं पाऊल टाकलंय.सर्वच जिल्ह्यांमध्ये राजकीय नेत्यांनी आपल्या मुलांची, मुलींची राजकीय सोय केली. पुणे, सोलापूर, परभणीमध्ये तर सर्वाधिक उमेदवार राजकीय घरातील आहेत. कुठे कुणाला, कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळालीय हेच पाहुया…


पुण्यात मंत्री, माजी मंत्री, माजी आमदारांची मुलगी, पत्नी रिंगणात

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी पहिल्यांदाच चिरंजीव श्रीराज भरणे यांना निवडणुकीत उतरवलयं. ते इंदापूर तालुक्यातील बोरी पंचायत समिती गणातून नशिब अजमावतायत. तर याच तालुक्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या कन्या अंकिता पाटील-ठाकरे या सलग दुसऱ्यांदा झेडपी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्या 2017 ला काँग्रेसकडून बावडा गटातून निवडून आलेल्या आहेत. त्याच गटातून पुन्हा त्या राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्ह्यावर निवडणूक लढवतायत. तर शिरुरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांचा मुलगा राजेंद्र गावडे हे टाकळी हाजी गटातून भाजपचे उमेदवार आहेत. तर भोरचे माजी आमदार व भाजप नेते संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपा थोपटे या भोरमधून पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उभ्या आहेत.


आमदार बापूसाहेब पठारेंच्या दोन्ही मुली झेडपीच्या उमेदवार

तर वडगाव शेरीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचा मुलगा सुरेंद्र पठारे, सुनबाई ऐश्वर्या पठारे पुणे महापालिकेत भाजपच्या तिकिटावर निवडून गेलेतत. आता त्यांच्या दोन्ही मुली देखील जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. एका मुलगी पूनम अमोल झेंडे या पुरंदरमधील दिवे गराडे गटातून राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत. तर दुसरी मुलगी दिपाली राहुल गव्हाणे या तळेगाव ढमढेरे रांजनगाव सांडस जिल्हा परिषद गटातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवायतयत.


माळशिरस तालुक्यात मोहिते पाटलांसह सातपुतेंच्या घरात उमेदवारी

सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक पक्षांनी राजकीय घरातील व्यक्तीनाच झेडपी आणि पंचायत समितीसाठी रिंगणात उतरवलंय. माळशिरस तालुक्यात शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील चुलत बंधू अर्जुनसिंह मोहिते पाटील आणि वहिनी वैष्णवी देवी मोहिते पाटील या निवडणूक लढवत आहेत. अर्जुनसिंह मोहिते पाटील हे फोंडशिरस जिल्हा परिषद गटातून, तर अर्जुनसिंह मोहिते यांची पत्नी वैष्णवीदेवी या यशवंतनगर गणातून निवडणूक लढवत आहेत. तर दहिवडी जिल्हा परिषद गटातून शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांचा मुलगा जीवन हा निवडणूक रिंगणात उतरलाय. तर याच गटातून भाजपने माजी आमदार राम सातपुते यांची पत्नी संस्कृतीला उमेदवारी दिलीय. तर माजी मंत्री व शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे पृथ्वीराज सावंत हे माढा तालुक्यातील मानेगाव जिल्हा परिषद गटातून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवतायत.


सांगोल्यात माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटलांचे पुत्र रिंगणात

सांगोला तालुक्याचे माजी विधानपरिषद आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचे पुत्र यशराज साळुंखे पाटील हे जवळा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवतायत. मंगळवेढ्यातून माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या कोमल निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात. त्या शरद पवार गटाकडून लक्ष्मी दहिवडी गटातून लढत आहेत. करमाळ्यात रश्मी बागल कोलते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर दिवंगत माजी आमदार दिगंबर बागल यांच्या कन्या रश्मी बागल-कोलते या भाजपकडून निवडणूक लढतायत. त्यांना पांडे जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळालीय.


आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे घरातीलही रिंगणात

अक्कलकोट तालुक्यात सत्ताधारी आमदार आणि माजी मंत्र्यांच्या कुटुंबियांना पक्षांनी तिकीटं दिलेत. या तालुक्यात शिवसेना आणि भाजपमध्ये लढत होतेय. भाजपचेच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची पत्नी शांभवी या चपळगाव जिल्हा परिषद गटातून उभ्या आहेत. तर त्यांचे बंधू सागर कल्याणशेट्टी यांना चपळगाव पंचायत समिती गणातून रिंगणात उतरविण्यात आलंय. माजी गृहराज्यमंत्री व शिवसेनेचे नेते सिद्धराम म्हेत्रे यांचा मुलगा व मुलगी दोघेही निवडणूक लढवतायत. मुलगा शिवराज हा सलगर जिल्हा परिषद गटातून, तर मुलगी शीतल ही पंचायत समितीच्या उमेदवार आहेत. तर मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हे कुरुल, तर त्यांचे भाऊ संतोष पाटील हे शिवसेनेकडून नरखेड गटातून उमेदवारी करतायत.


सुरेश वरपूडकरांच्या घरातील पाच उमेदवार, पक्ष तीन

तर परभणीमध्ये तर घराणेशाहीचा कहर झालाय. माजी मंत्री व भाजपचे नेते सुरेश वरपूडकरांच्या घरात पाच जणांना झेडपीचे तिकीट मिळालंय. भाजपकडून वरपूडकरांचा मुलगा समशेर, सून प्रेरणा, पुतण्या बोनी यांना भाजपने झेडपीसाठी तिकीट दिलंय. तर त्यांची कन्या सोनल वरपूडकर-देशमुख या उबाठाकडून, तर दुसरा पुतण्या अजित वरपूडकरला काँग्रेसने तिकीट दिलंय.


शिंदेंच्या आमदाराच्या पत्नीला भाजपचे तिकीट

सातारा जिल्ह्यात तर वेगळंच समीकरण पाहिला मिळालंय. कोरेगावचे एकनाथ शिंदे यांचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नीला भाजपने तिकीट दिलंय. प्रिया महेश शिंदे या खटाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढतायत.


कोल्हापूरमध्ये आवाडे घरातील चौथी पिढी राजकारणात

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आवाडे वजनदार घराणे आहेत. ‘आवाडे’ घराण्यातील चौथी पिढी आता निवडणूक रिंगणात उतरलीय. इचलकरंजीचे भाजप आमदार राहुल आवाडे यांच्या कन्या सानिका आवाडे यांना भाजपने जिल्हा परिषदचे तिकीट दिलीय.

हे केवळ तीन ते चार जिल्ह्यामधील चित्र आहे. यामध्ये सर्वाधिक घराणेशाही ही सोलापूरमध्ये आहे. जवळ-जवळच सर्वाच पक्षांच्या नेत्यांच्या घरातील लोकांना तिकीट मिळालंय. ही घराणेशाही स्वीकारायची की नाकारायचे हे तेथील कार्यकर्ते, मतदारांचे हातात आहेत. राजकीय घराणेशाहीबाबत तुम्हाला काय वाटतं. तुमच्या जिल्ह्यातही घराणेशाही आहे का ? असेल तर त्यांचे नावे आम्हाला कॉमेंटकरून सांगा.

follow us