‘छात्रों की गूंज’ नव्हे, ‘झूट की गूंज’; राहुल गांधींच्या दाव्यांवर फडणवीसांचा थेट हल्लाबोल
राहुल गांधींच्या दाव्यांची पडताळणी करण्यासाठी संबंधित तरुणीने ‘झूट की गूंज’ नावाची वेबसाईट सुरू केल्याचेही फडणवीसांनी सांगितले.
पुण्यात भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. (Bjp) या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावरून जोरदार टीका केली. राहुल गांधी देशभरातील तरुणांशी संवाद साधत असून, या कार्यक्रमातून केंद्र सरकारवर विविध मुद्द्यांवरून आरोप करत आहेत. मात्र, राहुल गांधींच्या या दाव्यांमध्ये तथ्य नसून त्यांचा ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम हा प्रत्यक्षात ‘झूट की गूंज’ असल्याचा थेट आरोप फडणवीसांनी केला.
आजच्या तरुणाईला जेन झी, अल्फा जनरेशन किंवा बिटा जनरेशन अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. मात्र, फडणवीसांनी या संपूर्ण पिढीकडे युवाशक्ती म्हणून पाहण्याची गरज असल्याचे सांगितले. ही युवाशक्ती अत्यंत हुशार असून कोणतीही माहिती डोळे झाकून स्वीकारत नाही, तर प्रत्येक दाव्याची पडताळणी करते, असे ते म्हणाले. राहुल गांधी यांनी कर्नाटकातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात आपल्या भाषणात केलेल्या 40 दाव्यांपैकी तब्बल 29 दावे एका तरुणीने फॅक्ट चेकच्या माध्यमातून खोटे असल्याचे दाखवून दिल्याचा दावा फडणवीसांनी केला.
DJ च्या वादात न पडता सांस्कृतिक गणेशोत्सव साजरा करा; फडणवीसांचं पुणेकरांना आवाहन
राहुल गांधींच्या दाव्यांची पडताळणी करण्यासाठी संबंधित तरुणीने ‘झूट की गूंज’ नावाची वेबसाईट सुरू केल्याचेही फडणवीसांनी सांगितले. राहुल गांधी तरुणांशी संवाद साधत असताना त्यांच्या भाषणातील दाव्यांची तरुणाईकडूनच तपासणी केली जात आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे राहुल गांधी जे सांगतात ते अंतिम सत्य मानण्याची परिस्थिती आता राहिलेली नाही, असा संदेश देण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला. तरुण पिढी माहितीची सत्यता तपासते आणि त्यानंतरच कोणत्याही वक्तव्यावर विश्वास ठेवते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला ‘छात्रों की गूंज’ असे नाव देण्यात आलं असले तरी प्रत्यक्षात तो ‘झूट की गूंज’ असल्याचे फडणवीसांनी पुन्हा अधोरेखित केलं. तरुणाईला भ्रमित करण्यासाठी करण्यात येणाऱ्या दाव्यांचा पर्दाफाश करण्याचं कामही तरुणच करत आहेत, असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला. त्यामुळं राहुल गांधींच्या कार्यक्रमातून मांडल्या जाणाऱ्या मुद्द्यांपेक्षा त्यामागील तथ्य तपासण्याची गरज असल्याचे फडणवीसांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झालं.