Pune Lok Sabha constituency : धंगेकरांना काँग्रेसमध्ये ‘तगडी’ स्पर्धा; तब्बल 20 इच्छुकांनी थोपटले दंड

Pune Lok Sabha constituency : धंगेकरांना काँग्रेसमध्ये ‘तगडी’ स्पर्धा; तब्बल 20 इच्छुकांनी थोपटले दंड

पुणे : लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसच्या (Congress) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचे नाव अंतिम मानले जात होते. मात्र आता त्यांना त्यांच्याच पक्षातून मोठी स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे. पुणे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी शहर काँग्रेसमध्ये इच्छुकांची फौजच असल्याचे पक्षाकडे आलेल्या अर्जावरून समोर आले आहे. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चवधरी, अनंत गाडगीळ, शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह तब्बल वीस जणांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत. (20 people are interested in the City Congress to contest the Pune Lok Sabha elections)

पुणे शहर लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत काँग्रेसकडे जाणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यादृष्टीने पक्षाने तयारी देखीस सुरू केली आहे. या जागेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून पक्षाने रविवारपासून अर्ज मागविले होते. अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. त्यानुसार काल अखेरपर्यंत पक्षाकडे तब्बल वीस इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये माजी मंत्री, आमदार, शहराध्यक्ष, यांच्यासह प्रदेश कार्यकारिणी असलेल्या पदाधिकाऱ्यांनी इच्छा व्यक्त केली आहे.

दुर्मिळ भीमथडी अश्वांना अधिकृत प्रजाती म्हणून मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा…

कोण आहेत 20 जण?

माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चवधरी, अनंत गाडगीळ, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी, पदाधिकारी अभय छाजेड, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, प्रदेश महिला कॉंग्रेसच्या उपाध्यक्ष संगीता तिवारी, माजी उपमहापौर आबा बागूल, दत्ता बहिरट, संग्राम खोपडे (आर.जे), नरेंद्र व्यवहारे, राजू कांबळे, मुकेश धिवार आणि दिग्विजय जेधे यांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले आहेत.

…म्हणून पुणे विमानतळाचं उद्घाटन रखडलं; आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण…

नाव दिल्लीतूनच फायनल होणार!

दरम्यान, उमेदवारी मिळविण्यासाठी काँग्रेसमध्ये चुरस असल्याचे सध्या तरी यादीवरून दिसून येत असले तरीही नाव दिल्लीतूनच अंतिम होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आधी शहर काँग्रेसकडून इच्छुकांची यादी प्रदेश काँग्रेसकडे पाठविली जाणार आहे. त्यानंतर प्रदेश कॉंग्रेसकडून अंतिम यादी अखिल भारतीय काँग्रेसकडे पाठविली जाणार आहे. दिल्लीत यादी गेल्यानंतर उमेदवारीची निवडून येण्याची क्षमता, पक्षातील कामगिरी, खर्च करण्याची क्षमता अशा विविध निकषांच्या आधारे नावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube