जानकरांची एन्ट्री… विटेकरांचा बळी देऊन अजितदादांनी बारामती सेफ केली?
शनिवारचा दिवस राज्याच्या राजकारणात सगळ्यांचा आश्चर्यचकित करुन गेला. जे महादेव जानकर (Mahadev Jankar) शुक्रवारपर्यंत भाजपला शिव्या घालत होते, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करत होते, शरद पवार (Sharad Pawar) यांना मोठ्या मनाचा माणूस म्हणत, महाविकास आघाडीसोबत माढा मतदारसंघाबाबत चर्चा करत होते, तेच जानकर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडून पुष्पगुच्छ स्वीकारतानाचा, फडणवीस यांना घट्ट मिठी मारतानचा एक फोटो व्हायरल झाला. पाठोपाठ ‘राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीतच राहणार असून जानकर यांना लोकसभेची एक जागा दिली जाणार’ अशा आशयाचे एक पत्रकही आले. (Ajit Pawar has given Parbhani Lok Sabha constituency to Mahadev Jankar for Baramati Lok Sabha constituency.)
या घडामोडीने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. राजकारणात कधीही कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो यावर शिक्कामोर्तब झाले. यानंतर जेवढे खूश महादेव जानकर दिसत होते, देवेंद्र फडणवीस दिसत होते तेवढेच खूश अजित पवारही दिसून येत होते. त्याचे कारण एका बाजूला बारामतीमध्ये विजय शिवतारे यांनी अजित दादांचे टेन्शन वाढविले आहे. पण जानकर यांच्या सोबत राहण्याने अजितदादांना बारामतीचा पेपर आता सोपा वाटू लागला आहे. आता बारामतीमधील धनगर मते अजितदादांच्या बाजूने येऊ शकतात. त्यामुळेच त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
मोठी बातमी : अजितदादांना नडणं भोवलं! शिवतारेंना शिंदेकडून निरोपाचा नारळ; आज धडकणार नोटीस
एका बाजूला बारामतीचा पेपर अजितदादांनी सोपा करवून घेतला असला तरी दुसऱ्या बाजूला त्यासाठी त्यांनी परभणीचा आणि त्यातही अत्यंत जवळच्या व्यक्तीचा बळी दिल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात होत आहे. हीच चर्चा नेमकी का होतीय, ते पाहूया…
आधीच वेगळी भूमिका घेतल्याने अजित पवार आणि सुनेत्रा पवार बारामतीमध्ये एकटे पडल्याचे चित्र आहे. संपूर्ण पवार कुटुंबीय शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत आहे. अशात मगाशी सांगितल्याप्रमाणे बारामती मतदारसंघात विजय शिवतारे यांनी अजित पवार यांची डोकेदुखी वाढवली आहे. मात्र जानकर सोबत आल्याने आता अजित पवार यांना बारामतीचा पेपर काहीसा सोपा वाटत आहे. बारामती मतदारसंघातील दौंड, बारामती, इंदापूर आणि भोरच्या काही भागात मोठ्या प्रमाणात असलेल्या धनगर मतांचा आपल्याला फायदा होऊ शकतो अशी शक्यता अजित पवार यांना वाटत आहे.
त्याचवेळी बारामतीसाठी अजितदादांना परभणी सोडावी लागली आहे. जानकर यांनी माढा आणि परभणी मतदारसंघातून तयारी केली आहे. भाजपने माढ्यातील उमेदवार जाहीर केल्याने जानकरांना परभणीमधून उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास अंतिम झाले आहे. आधी परभणीवर अजित पवार यांनीच दावा केला होता. पण त्यांनीच जानकरांना परभणी सोडण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. या घडामोडीमुळे परभणीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार आणि अजितदादांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे राजेश विटेकर नाराज झाल्याचे दिसून येत आहे.
घराचे महाभारत कोणी केलं? विचारत सुनेत्रा पवारांच्या जाऊबाईंना रूपाली पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर
परभणी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला अद्याप एकदाही यश आले नसले तरी पक्षाची मोठी ताकद आहे. मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह बाजार समित्यांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. परभणीसह जिंतूर तालुक्यातील दोन्ही बाजार समित्या, पाथरी आणि सोनपेठ या भागातील बाजार समित्या राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. याशिवाय महाविकास आघाडीच्या काळात इथले पालकमंत्रीपदही राष्ट्रवादीकडेच होते. घनसावंगीमध्ये शरद पवार यांच्या गटात असले तरीही राजेश टोपे यांच्यारुपाने राष्ट्रवादीचे आमदारही आहेत.
त्यामुळे आघाडीच्या जागा वाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच होता. 1999 पासून आतापर्यंतच्या लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने कायमच दोन नंबरची मते घेतली आहेत. गत दोन निवडणुकांमध्ये तर साडे चार लाखांहून अधिक मते राष्ट्रवादीने घेतली होती. गतवेळी राजेश विटेकर यांनी तब्बल 4 लाख 96 हजार मते घेतली होती. त्यांचा केवळ 42 हजार मतांनी पराभव झाला होता.
यंदाही आमदार बाबाजाणी दुर्रानी यांनी इथून राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरच इथला उमेदवार असणार असा दावा केला होता. तसेच उमेदवार म्हणूनही विटेकर यांच्या नावाची चर्चा होती. विटेकर यांचे दौरेही सुरू झाले होते. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या होत्या. शहरात विटेकर यांनी शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर प्रताप देशमुख यांच्यासह अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. पण अजित पवार यांनी ही जागा जानकरांना सोडल्याने विटेकरांना थांबावे लागणार आहे. त्यामुळेच अजित पवार यांनी परभणीचा बळी देऊन बारामती सेफ केल्याची चर्चा होत आहे.