Pune : महायुतीतील वाद टोकाला; वडगाव-शेरी राष्ट्रवादीला सोडल्यास मदत न करण्याचा भाजपचा इशारा

Pune : महायुतीतील वाद टोकाला; वडगाव-शेरी राष्ट्रवादीला सोडल्यास मदत न करण्याचा भाजपचा इशारा

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीत वडगाव शेरी (Vadgaon Sheri) मतदारसंघ भाजपला न मिळाल्यास कोणताही कार्यकर्ता राष्ट्रवादीचे (NCP) काम करणार नाही, असा इशारा भाजपचे वडगाव शेरीचे विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अर्जुन जगताप यांनी दिला आहे. पुणे शहरातील मतदारसंघांची नवी जबाबदारी मिळालेल्या आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना पत्र लिहून जगताप यांनी हा इशारा दिला आहे. (Arjun Jagtap has demanded that Vadgaon Sheri assembly constituency should be given to BJP)

“इथले राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षाचे आमदार महायुतीत आहेत. पण त्यांनी महायुतीला कोणतेही सहकार्य केले नाही. उलट महायुतीच्या उमेदवाराविरोधातच काम केले. जर त्यांनी महायुती धर्म पाळला असता आणि खंबीरपणे साथ दिली असती तर मुरलीधर मोहोळ यांची आघाडी अजून वाढली असती. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्यास वडगावशेरी मतदारसंघातील भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून त्या उमेदवारास कुठल्याही प्रकारचे सहकार्य होणार नाही,” असे या पत्रात म्हंटले आहे.

जगताप यांनी पत्रात काय म्हंटले आहे?

विधानसभा निवडणुकीसाठी वडगावशेरी मतदारसंघामधून उमेदवारी भाजपाच्या सदस्यास मिळावी अशी तीव्र इच्छा येथील भाजपचे स्थानिक नेते आणि सर्व कार्यकर्त्यांची आहे. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपची विचारसरणी रुजवण्यात आणि येथे भाजपचे कार्यकर्ते घडविण्यात माजी आमदार जगदीश मुळीक यांचा मोलाचा वाटा आहे. 2014 पूर्वी या मतदारसंघात पक्षाचा एकच नगरसेवक होता. 2014 मध्ये जगदीश मुळीक आमदार झाल्यानंतर या मतदारसंघात भाजपचे 14 नगरसेवक निवडून आले.

वडगावशेरी मतदारसंघ हा लोकसंखेच्या दृष्टीने मोठा आहे. इथे अंदाजे चार लाख 70 हजार मतदार आहेत. यात सर्वधर्मीय नागरिकांचा समावेश आहे. अलीकडील काळात यात परप्रांतीयांचे प्रमाण वाढले आहे. यातील बहुसंख्य मतदार हे भाजपच्या विचारसरणीशी अनुकूल असून ही भाजपच्या उमेदवारासाठी जमेची बाजू आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपले महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना केवळ भाजपाच्या कार्यकुशलतेमुळे वडगावशेरी मतदारसंघात अंदाजे 15 हजार 600 पेक्षा जास्तीच्या लिडने निवडून आले.

पण सांगताना खंत वाटते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या घटक पक्षाचे विद्यमान आमदार महायुतीत असताना देखील त्यांनी महायुतीस कुठल्याही प्रकारचे सहकार्य केले नाही. उलट महायुतीच्या उमेदवारा विरोधात काम केलेले आहे. जर त्यांनी महायुती धर्म पाळला असता आणि खंबीर पणे साथ दिली असती तर मुरलीधर मोहोळ यांचे लीड अजून वाढले असते. त्यामुळे जर विधानसभेसाठीची उमेदवारी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास गेली तर वडगावशेरी मतदारसंघातील भाज.पच्या कार्यकर्त्यांकडून त्या उमेदवारास कुठल्याही प्रकारचे सहकार्य होणार नाही, कृपया याची नोंद घ्यावी. तरी आपण या विषयाची दखल घेऊन वडगावशेरी मतदारसंघातील उमेदवारी भाजपच्या सदस्यास मिळावी यासाठी विशेष प्रयत्न करावे ही आपणास नम्र विनंती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube