नास्तिकांचा मेळावा रविवारी पुण्यात भरणार? कोणकोण जाणार?
पुणे : पुण्यात रविवारी (ता.19 मार्च) आठव्या नास्तिक मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती शहीद भगतसिंग विचार मंचच्या वतीनं देण्यात आली आहे. गेल्या वर्षी या मेळाव्याला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, यंदा पुन्हा एकदा मेळाव्यात आयोजन करण्यात आलं आहे.
नवी पेठेतील एस. एम. जोशी फाउंडेशन मध्ये रविवारी सकाळी 10 ते 1 दरम्यान हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यास प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून ज्येष्ठ विज्ञानलेखक व स्त्रीरोग तज्ञ डॉ.शंतनु अभ्यंकर हे “न नास्तिकतेचा” या विषयावर तर स्तंभलेखक, रेडिओ जॅकी संग्राम खोपडे हे “नास्तिक दिन आयेंगे” या विषयावर बोलणार आहेत. तर“हो आम्ही आहोत नास्तिक” आणि “परमेश्वरावर मात” या दोन पुस्तकांचे प्रकाशन ही मेळाव्यात करण्यात येणार आहे. या मेळाव्याला महाराष्ट्रातील 27 जिल्ह्यातील व्यक्तींनी नोंदणी केली आहे.
दरम्यान, नास्तिक मेळावा आयोजित करण्यामागील भूमिका आयोजकांनी स्पष्ट केली आहे. ते म्हणाले,
“जग आणि मानवी जीवन यांना प्रभावित करणारी कोणतीही सर्वशक्तिमान अलौकिक शक्ती अस्तित्वात नाही. असे म्हणताना आम्ही कोणताही धार्मिक अभिनिवेश बाळगत नाही. “आमचे नास्तिक्य विचारपूर्वक असून त्यात कोणताही अहंकार नाही”, असे शहीद भगतसिंग म्हणत. तीच आमची भूमिका आहे.भारतीय राज्यघटनेत देखील उपासना स्वातंत्र्य मान्य करताना “ईश्वराचे अस्तित्व अमान्य करण्याचे स्वातंत्र्य”, आवर्जून नमूद केलेले आहे.नास्तिक म्हणून आमची सर्वसाधारण ओळख आहे. तरी विचारांच्या वैविध्यामुळे काही जण स्वत:ला अज्ञेयवादी, विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी, मुक्तचिंतक इत्यादी नावानी संबोधतात.प्राचीन काळापासून थोर नास्तिक होऊन गेले. त्यांचे सामाजिक विकासातील आणि इतर क्षेत्रातील जसे कला, विज्ञान, साहित्य योगदान लक्षणीय आहे. आजही अनेक नास्तिक राजकारण, साहित्य, विज्ञान, कला आणि सामाजिक क्षेत्रात आघाडीवर काम करताना दिसतात. अशा सर्व नास्तिकांसोबत आज आम्ही आपले ऐक्य घोषित करत आहोत. “, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
IND vs AUS : अटीतटीच्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 5 गडी राखून दणदणीत विजय
यंदा पोलिसांची परवानगी घेतली का?, असे आयोजकांना विचारले असता ते म्हणाले की, हा मेळावा म्हणजे नास्तिकांचे स्नेहमिलन आणि वैचारिक देवाणघेवाण अशा स्वरूपात आहे, त्यामुळे या मेळाव्यासाठी पोलिसांची परवानगी घेण्याची आम्हाला गरज नाही, आयोजकांनी सांगितले. आता या मेळाव्यास पोलिसांकडून काही अडकाठी येते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.