मोठी बातमी! पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर
Pune Accident News : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, 19 मे रोजी पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील पोर्शे कार अपघात प्रकरणात (Porsche Car Accident) आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाला मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) जामीन मंजूर केला आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीला नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे. तर काही दिवसापूर्वीच अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना देखील तीन गुन्ह्यांपैकी एका गुन्ह्यात जामीन मंजूर करण्यात आला होता.
अल्पवयीन मुलाची आत्या पूजा जैन यांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने मान्य केली. तसेच कोर्टाने मुलाला आत्याच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणात माहिती देताना वकील ऍड. प्रशांत पाटील म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून या प्रकरणात आरोपी अल्पवयीन मुलाचा तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहे. तसेच अल्पवयीन मुलाचा ताबा आत्याकडे देण्यात यावा असा आदेश मुबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
आदेशात न्यायालयाने नमूद केले आहे की, बालहक्क न्यायालयाने 22 मे, 5 जून आणि 12 जून 2024 रोजी जे आदेश दिले होते ते रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे विधीसंघर्षित बालकाला तातडीने सोडावे आणि त्याचा ताबा आत्याकडे देण्यात यावे अशी माहिती वकील ऍड. प्रशांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
तर दुसरीकडे या काही दिवसापूर्वी आरोपी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) यांना तीन गुन्ह्यांपैकी एका गुन्ह्यात जामीन मिळाला आहे. त्यांना अल्पवयीन मुलाला ड्रायव्हिंग लायसन्स नसताना तसेच तो दारू प्यायलेला असतानाही कार चालवायला दिल्याच्या गुन्ह्यात पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तर ड्रायव्हरचे अपहरण आणि धमकी तसेच रक्तगट नमुने फेरफार प्रकरणात आतापर्यंत निर्णय न झाल्याने विशाल अग्रवाल यांचा मुक्काम येरवडा कारागृहातच राहणार आहे.
प्रकरण काय
19 मे च्या पहाटे भरधाव पोर्शे कार चालवून बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दोन जणांचा जीव घेतला होता. या प्रकरणात त्याला सुरुवातील अवघ्या एका दिवसात जामीन मिळाला होता मात्र त्यानंतर त्याचा जामीन रद्द करून त्याला 14 दिवसांसाठी बाल निरीक्षणगृहात पाठवण्यात आले होते.
नगरला वारं फिरलं! आमदारकीसाठी ‘मविआ’कडे इच्छुकांची गर्दी; कुणाचं पारडं जड?