संतोष देशमुख हत्या प्रकरण : फरार सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेला बेड्या; पुण्यातून अटक
Beed Crime : मस्साजोग गावचे सरपंत संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. फरार तिघा जणांपैकी सुदर्शन चंद्रभान घुले आणि सुधीर ज्ञानोबा सांगळे या दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. कृष्णा सांगळे हा अद्याप फरार असून पोलीस त्याच्याही मागावर आहेत. विशेष म्हणजे, संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर 25 दिवसांनी या दोघांना अटक झाली आहे. दरम्यान, या दोघांनी पुण्यातून अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सीआयडी आणि एसआयटीच्या पथकांनी ही कारवाई केली आहे.
या आरोपींना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. सुदर्शन चंद्रभान घुले (वय 26 रा. टाकळी ता. केज) आणि सुधीर ज्ञानोबा सांगळे (वय 23 रा. टाकळी ता. केज) यांना अटक केली आहे. तर कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघे जण अनेक दिवसांपासून फरार होते. या आरोपींवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचा शोध घेतला जात होता. विशेष पोलीस पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीची खात्री करून पुण्यात छापा टाकून या दोघांच्या मुसक्या आवळल्या.
संतोष देशमुख यांचं अपहरण करुन अतिशय निघृणपणे त्यांची हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण राज्यात चर्चेत आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी या प्रकरणी राज्य सरकारल चांगलंच धारेवर धरलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आरोपींच्या अटकेसाठी काही दिवसांपूर्वी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता.
मोठी बातमी! वाल्मिक कराडचा पाय खोलात; विष्णू चाटेनी दिली खळबळजनक कबुली
फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी या मोर्चात करण्यात आली होती. आरोपींना अटक होत नसल्याच्या निषेधार्थ नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मस्साजोग ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी पंधरा दिवसांत कारवाईचं आश्वासन दिलं होतं. यानंतर चारच दिवसांत आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
तसेच या प्रकरणात रोजच नवनवीन खुलासे होत असल्याने राज्य सरकारवरील दबाव वाढत चालला होता. या फरार आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तयार करण्यात आली होती. या पथकांमार्फत आरोपींचा कसून शोध घेतला जात होता. या प्रकरणात आधी चार जणांना अटक करण्यात आली होती.
विष्णू चाटेसह आणखी तिघांचा यात समावेश होता. तर आणखी तिघेजण फरार होते. यांचाही शोध घेतला जात होता. या आरोपींना पकडण्यासाठी प्रसिद्धीपत्रक जारी करून त्यांना फरार घोषित करण्यात आलं होतं. यानंतर दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. एक जण मात्र अजूनही फरार आहे. या फरार आरोपीचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे.
मध्येच श्वास थांबतो अन् झोप.. वाल्मिक कराडला असणारा स्लीप ऍप्निया नेमका काय?