Video : पुण्याचा चेहरामोहरा बदलणार; तीन उन्नत महामार्गांमुळं वाहतूक कोंडीला दिलासा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या तीन महामार्गांमुळे पुणे-नगर, पुणे-सोलापूर तसेच चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल.

News Photo   2026 07 18T181152.747

पुण्यातील तीन महत्त्वाच्या उन्नत महामार्गांच्या (Pune) भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत, पुढील तीन ते चार वर्षांत पुण्याचा चेहरामोहरा पूर्णपणे बदललेला दिसेल, असा विश्वास व्यक्त केला. पुणे-शिरूर, हडपसर-यवत आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर या तीन उन्नत महामार्गांच्या उभारणीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

फडणवीस म्हणाले की, पुणे हे देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक असून लोकसंख्या आणि वाहनसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे केवळ विद्यमान रस्त्यांचे रुंदीकरण पुरेसे ठरणार नाही. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन उन्नत महामार्ग, रिंग रोड, मेट्रो आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांची उभारणी करण्यात येत आहे. या तीन महामार्गांमुळे पुणे-नगर, पुणे-सोलापूर तसेच चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल.

उन्नत महामार्गांसाठी अजितदादांचे सहकार्य; मंत्री नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा

यामध्ये प्रवासाचा वेळ वाचेल, इंधनाची बचत होईल आणि औद्योगिक तसेच आर्थिक विकासाला गती मिळेल, असेही त्यांनी सांगितले. तसंच, पुणे शहराला जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट असून, विविध प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून हे प्रकल्प पूर्ण होत असल्याचे सांगत त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचेही योगदान गौरवले.

या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उन्नत महामार्गांमुळे पुणे आणि परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडून येईल आणि शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

follow us