ब्रेमेन चौक येथे उड्डाणपूल प्रकल्पासाठी तज्ज्ञ सल्लागार नेमा; नगरसेवक सनी निम्हण यांची मागणी
सनी विनायक निम्हण म्हणाले, “लोकभवन रोड हा पुणे आणि पिंपरी-चिंचवडला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे.
पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक (Pune) तथा राज्य सुधारित युवा धोरण समिती सदस्य सनी विनायक निम्हण यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन देत शिवाजीनगर मतदारसंघातील ब्रेमेन चौक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन प्रस्तावित उड्डाणपूल प्रकल्पासाठी तज्ज्ञ सल्लागार नियुक्त करण्याची मागणी केली आहे.
शिवाजीनगर मतदारसंघातील औंध येथील ब्रेमेन चौक हा पुणे महानगरपालिका हद्दीतील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा चौक असून, औंध–विद्यापीठ परिसर तसेच मुंबई–बंगळुरू महामार्गाला जोडणारा प्रमुख मार्ग आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PMC-PCMC) यांना जोडणारा हा महत्त्वाचा दुवा असल्याने या मार्गावर दिवसेंदिवस वाहतुकीचा मोठा ताण वाढत आहे. याच मार्गावर अनेक व्हीआयपींची ये-जा होत असल्यामुळे हा “व्हीआयपी मूव्हमेंट रोड म्हणूनही ओळखला जातो.
नाशिकनंतर NEET पेपर फुटीप्रकरणात पुणे कनेक्शन समोर; 15 लाखात विकला पेपर?
सध्या ब्रेमेन चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून त्यामुळे वाहतूक रहदारी विस्कळीत होत आहे. नागरिकांना दररोज मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून, या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून या ठिकाणी उड्डाणपूल उभारणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पुणे महानगरपालिकेच्या सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये ब्रेमेन चौक येथे उड्डाणपूल / ग्रेड सेपरेटर बांधण्यासाठी निधीची तरतूद उपलब्ध करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीसाठी तांत्रिक व्यवहार्यता अहवाल (Feasibility Report) तयार करणे तसेच प्रकल्पाचे तांत्रिक नियोजन करण्यासाठी अनुभवी तज्ज्ञ सल्लागाराची नियुक्ती करणे आवश्यक असल्याची मागणी श्री. निम्हण यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत बोलताना सनी विनायक निम्हण म्हणाले, “लोकभवन रोड हा पुणे आणि पिंपरी-चिंचवडला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या ठिकाणी ब्रेमेन चौक ते राजीव गांधी ब्रीज येथे उड्डाणपूल / ग्रेड सेपरेटर उभारण्यात आल्यास पुणे ते PCMC आणि PCMC ते पुणे असा प्रवास करणाऱ्या वाहनांना कोणत्याही सिग्नलशिवाय अधिक जलद आणि सुरळीत प्रवास करता येईल. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन नागरिकांचा वेळ आणि इंधनाची बचत होण्यास मदत होईल. दरम्यान, या निवेदनाची दखल घेत पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, संबंधित प्रकल्पाबाबत गोजारी साहेब यांच्याशी चर्चा करून पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
त्याचबरोबर नुकतेच या मार्गावरील पोलिस विभागाच्या हेरिटेज इमारती हटविण्याचे काम सुरू करण्यात आले असून, त्यामुळे येत्या काळात हा संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी अधिक मोकळा आणि सुकर होण्यास मदत होणार आहे. यामुळे भविष्यातील वाहतूक नियोजन आणि प्रस्तावित उड्डाणपूल प्रकल्पाला अधिक गती मिळणार असल्याचेही सांगण्यात आले. या प्रस्तावित प्रकल्पामुळं औंध, शिवाजीनगर तसेच PMC-PCMC दरम्यानची वाहतूक अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुरळीत होण्यास मोठी मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.