दाभेकरांनी राहुल गांधींचं ऐकलं.. कलाटे अजितदादांचं ऐकणार का?
विष्णू सानप
पुणे : कसबा पोटनिवडणुकीत पक्षाने उमेदवारी न दिल्याने काँग्रेसकडून बंडखोरी केलेल्या बाळासाहेब दाभेकर यांनी आज (ता.9 फेब्रुवारी) काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांनी त्यांना फोन केल्यानंतर आपण उमेदवारी मागे घेतल्याचे जाहीर करत उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यामुळे कसब्यातील महाविकास आघाडीचे अर्थात धंगेकरांचे टेन्शन कमी झाले आहे.
दरम्यान, चिंचवडमध्ये शिवसेनेचे (ठाकरे) राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीची डोकेदुखी काही कमी झालेली नाही. त्यामुळे राहुल गांधी यांचा जसं दाभेकरांनी ऐकलं त्या प्रकारे अजितदादांचं कलाटे ऐकणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर चिंचवडमधून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून राहुल कलाटे यांचच नाव आघाडीवर होतं. मात्र अर्ज भरण्याच्या दिवशी राष्ट्रवादीने आपल्या पक्षाचा उमेदवार म्हणजेच विठ्ठल उर्फ नाना काटे यांची उमेदवारी घोषित करून कलाटेंना धक्का दिला. त्यानंतर कलाटेंनी अपेक्षेप्रमाणे बंडखोरी करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे चिंचवडमध्ये तिरंगी आणि चुरशीची लढत होणार असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.
2019 ला दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार म्हणून सर्व पक्षांच्या पाठिंब्याने महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग म्हणून कलाटे यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत कलाटेंनी लाखाहून अधिक मते घेतली होती. त्यामुळे या पोटनिवडणुकीत कलाटेंनाच तिकीट मिळणार, असा कयास राजकीय जाणकारांकडून लावला जात होता. तशी तयारी देखील कलाटे यांच्याकडून करण्यात आली होती. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चिंचवडची जागा शिवसेनाच लढवणार, असं जाहीर केल्याने या चर्चांना अधिकच बळ मिळाले होते.
दरम्यान, कलाटेंना पाठिंबा देण्यावरून राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी विरोध दर्शवत आयात उमेदवाराला उमेदवारी देण्यापेक्षा आपल्या पक्षातीलच निष्ठावंताला उमेदवारी द्यावी, असा आग्रह धरला. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी ही जागा राष्ट्रवादीकडे खेचत महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादीचे नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, पवारांना कलाटेंची मनधरणी अद्यापही करता आली नाही किंबहुना यश आलं नाही, असं चित्र दिसतंय.
उद्या (ता.10 फेब्रुवारी) दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुभा आहे. त्यामुळे अजितदादा आज रात्रीत जादूची कांडी फिरवत किंवा कलाटेंची मनधरणी करण्यात यशस्वी होतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कलाटे यांची समजूत काढण्यात अजितदादांना जर अपयश आलं तर कलाटे हे महाविकास आघाडीसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतात. याचं कारण असं की, या मतदारसंघांमध्ये कलाटे यांची मोठी ताकद आहे. नाना काटे जरी महाविकास आघाडीचे उमेदवार असले तरी त्यांची व्यक्तिगत ताकद या मतदारसंघांमध्ये मर्यादित स्वरूपाची आहे. या तुलनेत कलाटे त्यांच्यापेक्षा वरचढ ठरतात.
दुसरीकडे अश्विनी जगताप यांना सहानुभूती बरोबरच या मतदारसंघातील भाजपची ताकद सोबत आहे. त्यामुळे त्या या दोन्ही उमेदवारापेक्षा सरस मानल्या जात आहेत. त्यामुळे चिंचवडमध्ये महाविकास आघाडीला जर विजयाच्या जवळ पोहोचायचं असेल तर कलाटेंची समजूत काढावीच लागणार आहे, अन्यथा ही निवडणूक आश्विनी जगताप यांना जिंकणं अवघड नाही.
दरम्यान, ही निवडणूक जिंकणे अवघड नसल्याचे अजित पवार यांनी जरी म्हटले असले तरी तिरंगी लढत ही महाविकासा गाडीच्या हिताची नसून भाजपच्या हिताची आहे असेच राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. आता उद्या कलाटे आपली उमेदवारी मागे घेतात की ही निवडणूक लढतात हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.