“अजितदादांशी बोलून घ्या, तिकडून ग्रीन सिग्नल आला की लगेच…”; जय पवारही राजकीय एन्ट्रीसाठी सज्ज
पुणे : पार्थ पवार यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुसरा मुलगा जय पवारही राजकारणात येण्यासाठी सज्ज झाले आहेत. “तुम्ही दादांशी बोलून घ्या, तिकडून ग्रीन सिग्नल आला की मी लगेच तयार आहे”, असे म्हणत त्यांनी राजकीय एन्ट्रीचे संकेत दिले. ते आज (29 ऑगस्ट) बारामतीमध्ये शहर कार्यालयात आले होते, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (DCM Ajit Pawar’s Son Jai Pawar is ready to join politics)
काय म्हणाले जय पवार?
बारामतीत शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शारदा प्रांगण येथे सभा झाली. त्यानंतर दोन दिवसांनी अजित पवार यांचे दुसरे चिरंजीव जय पवार यांनी बारामतीतील राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयाला भेट दिली. “मी तुमच्या सगळ्यांचे कौतुक करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे” असे म्हणत त्यांनी अजित दादांयांच्या सभेसाठी कार्यकर्त्यांनी केलेल्या तयारीचे त्यांनी कौतुक केले. यावेळी जय पवार यांनीही राजकारणात सक्रिय व्हावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. त्यावर, “तुम्ही दादांशी बोलून घ्या, त्यांनी मला सिग्नल दिला की मी लगेच तयार आहे” असे देखील जय पवार म्हणाले.
शरद पवारांना चिडविण्याचे भाजपचे नियोजन : INDIA बैठकीच्या वेळीच अजितदादांचे NDA मध्ये स्वागत
अजित पवार यांना दोन मुले. यातील मोठा पार्थ पवार तर धाकटे जय पवार. यातील पार्थ पवार यांनी यापूर्वीच सक्रिय राजकारणात उडी घेतली आहे. त्यांनी 2019 मध्ये मावळ मतदारसंघातून श्रीरंग बारणे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली. मात्र त्यात त्यांना पराभव स्विकारावा लागला. यानंतर ते फारसे सक्रिय राजकारणात दिसले नाहीत. मात्र दोन महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्या बंडानंतर पार्थ आणि जय पवार दोघेही सक्रिय झालेले दिसून येत आहेत.
Mumbai : मंत्रालयात खळबळ! धरणग्रस्त शेतकऱ्यांनी दुसऱ्या मजल्यावरून पाठोपाठ मारल्या उड्या
अजित पवार यांच्या गटाची बंडानंतर चारच दिवसात एमआयटी सेंटरमध्ये भव्य सभा पार पडली होती. यावेळीही पार्थ आणि जय पवार यांनी सक्रियपणे लक्ष घालून सभा यशस्वीपणे पार पडण्यासाठी नियोजन केले होते. जय हे अजित पवार यांच्या भाषणावेळी पूर्णवेळ पाठिशी होते. तर पार्थ समोरील सोफ्यावर बसल्याचे दिसून आले. अजित पवार यांच्या बंडासाठी पडद्यामागे बऱ्याच हालचाली झाल्या आहेत. यात पार्थ पवार यांनी पडद्यामागे राहून सूत्रे हलविली असल्याचे सांगितले जाते.