शिक्षणाचा उद्देश पैसा कमावणं नव्हे, तर माणूस घडवणं असावा, राज्यपाल राजेंद्र आर्लेकर
पदवी मिळवून मोठी नोकरी मिळवणं हेच शिक्षणाचं अंतिम ध्येय आहे का, राज्यपाल राजेंद्र आर्लेकरांनी याच प्रश्नातून उद्देशाकडे लक्ष वेधलं.
Rajendra Arlekar Education Speech : पुण्यातील ‘फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जायझिंग लाइव्हज’ अर्थात फ्युएल संस्थेचा 20 वा स्थापना दिन आणि दुसरा दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी शिक्षणाच्या खऱ्या उद्देशावर भाष्य केलं. चांगली नोकरी, मोठं वेतन आणि आर्थिक संपन्नता मिळवणं एवढ्यापुरतं (Education) शिक्षण मर्यादित राहू नये, तर त्यातून समाजासाठी काम करण्याची आणि गरजू लोकांना मदत करण्याची भावना विकसित झाली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमात व्यवस्थापन अभ्यासक्रमातील 2024-26 च्या तुकडीसह विविध सीएसआरच्या मदतीने चालवल्या जाणाऱ्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना पदवी आणि प्रमाणपत्रं प्रदान करण्यात आली.
दीक्षांत समारंभाच्या व्यासपीठावरून ‘फ्युएल स्किलटेक युनिव्हर्सिटी, पुणे’ या नव्या विद्यापीठाच्या उद्घाटनाची औपचारिक घोषणाही करण्यात आली. कार्यक्रमाला कुलपती डॉ. सुलभा देशपांडे, संस्थेचे अध्यक्ष आणि कुलगुरू डॉ. केतन देशपांडे, बजाज फिनसर्व्ह ॲसेट मॅनेजमेंट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक गणेश मोहन, एसबीआय फाउंडेशनचे अध्यक्ष आणि मुख्य परिचालन अधिकारी प्रत्युष मेहरोत्रा, आमदार राणा जगजितसिंह पाटील, प्रा. मयुरी देशपांडे आणि ऑलकार्गो ग्रुपचे अध्यक्ष शशी किरण शेट्टी उपस्थित होते. या सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशासोबतच कौशल्याधारित शिक्षण आणि रोजगारनिर्मितीच्या संधींवरही भर देण्यात आला.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या पदव्या, डिप्लोमा आणि प्रमाणपत्रांचा प्रत्यक्ष जीवनात कसा उपयोग होतो, हे अधिक महत्त्वाचं असल्याचं आर्लेकर यांनी स्पष्ट केलं. चांगले गुण, बंगला, महागड्या गाड्या आणि आर्थिक सुबत्ता मिळवणं हेच शिक्षणाचं अंतिम ध्येय मानू नये, तर चांगला माणूस घडवण्यालाही तितकंच महत्त्व दिलं पाहिजे, असं ते म्हणाले. केवळ भाषणं ऐकून न थांबता त्यातील विचार कृतीत उतरवण्याचं आवाहनही त्यांनी केलं. शिक्षणातून स्वतःच्या पायावर उभं राहताना समाजातील इतर घटकांसाठीही काहीतरी करण्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे, असं त्यांनी नमूद केलं.
IND vs NZ : तिलक-नितीशने न्यूझीलंडच्या जबड्यातून विजय खेचून आणला; अखेरच्या षटकात थरार !
फ्युएल संस्थेचं मॉडेल हे शैक्षणिक ज्ञान, व्यावहारिक कौशल्यं, उद्योगांशी सहकार्य आणि उद्योजकता यांची सांगड घालणारं असल्याचं आर्लेकर यांनी सांगितलं. तरुणांना केवळ नोकरी मिळवण्यासाठी तयार करण्याऐवजी स्वतः रोजगार निर्माण करण्यासाठी सक्षम करणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी नोकरी शोधणारे नव्हे, तर इतरांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणारे बनावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिक्षण, व्यावहारिक कौशल्यं आणि उद्योजकता यांच्या एकत्रित प्रयत्नातून तरुणांना स्वावलंबी बनवता येईल. अशा शिक्षण पद्धतीचा देशातील शैक्षणिक संस्थांनी आणि राज्यांनी स्थानिक गरजांनुसार विचार करावा, असं आवाहनही त्यांनी केलं.
फ्युएलचे अध्यक्ष आणि कुलगुरू डॉ. केतन देशपांडे यांनी संस्थेच्या 20 वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेतला. युवकांना कौशल्याधारित शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर संस्थेने सातत्याने भर दिला असून, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनातून संस्थेला दिशा मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. 2022-26 या तुकडीतील 80 टक्के विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळाल्या असून, या विद्यार्थ्यांचं वेतन त्यांच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाच्या दुप्पट झाल्याचा दावा त्यांनी केला. उद्योगसमूहांच्या सहकार्याने डेटा सायन्स, फायनान्स आणि अन्य क्षेत्रांतील अभ्यासक्रमांचा विस्तार करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
बजाज फिनसर्व्ह ॲसेट मॅनेजमेंटचे व्यवस्थापकीय संचालक गणेश मोहन यांनी तंत्रज्ञानामुळे रोजगार संपत नसून कामाच्या पद्धती बदलत असल्याचं सांगितलं. बदलत्या तंत्रज्ञानामुळे नव्या संधी निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांनी नेतृत्वगुण विकसित करण्याबरोबरच मानवी संबंधही जपावेत, असं त्यांनी नमूद केलं. ऑलकार्गो ग्रुपचे अध्यक्ष शशी किरण शेट्टी यांनी लॉजिस्टिक्स क्षेत्रातील शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी आणि उद्योग व शैक्षणिक संस्थांमधील सहकार्य वाढवण्यासाठी फ्युएलसोबत सामंजस्य करार करण्याची इच्छा व्यक्त केली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉ. प्राची आहेरराव यांनी केलं, तर प्रा. मयुरी देशपांडे यांनी आभार मानले.