भाजपमध्ये ‘सडक से संसद तक’चा नवा अध्याय, पुण्यातील मंडलाध्यक्षांना थेट सर्वोच्च नेतृत्वाकडून धडे

Ek Pan Ek Karykarta : लोकसभा निवडणुकीत मोठी पीछेहाट झाली. (Pune) मात्र, संघटनेच्या जोरावर भाजपने विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवलं. आता महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी ‘एक पान-एक कार्यकर्ता’ या रणनितीवर जोरदार तयारी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील भाजप मंडल अध्यक्षांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत थेट संवाद साधत पुणे मंडल अध्यक्षांनी आगामी स्थानिक निवडणुकांचा फीडबॅक दिला. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने हा दौरा पार पडला. दरम्यान, अमित शहा यांनी यावेळी मतदारयादीतील प्रत्येक पानावर (पन्ना) नियुक्त असलेल्या कार्यकर्त्यांशी थेट संपर्कात राहा, अशी सूचना दिली. “कार्यकर्ता हेच पक्षाचे खरे बळ आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमधील विजय ही केवळ रणनीती नव्हे, तर कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांची फलश्रुती आहे, असे त्यांनी स्पष्ट केलं.
VIDEO : सातबारा घेऊन बिंदू चौकात या! राजू शेट्टींचं राजेश क्षीरसागरांना ओपन चॅलेंज, पुढे काय झालं?
नड्डा यांनी सांगितले की, “भाजप कायम इलेक्शन मोडमध्ये असतो कारण आम्ही हार-जीत बाजूला ठेवून आकडेवारी आणि ग्राउंड फीडबॅकवर आधारित पुढील रणनिती आखतो.” मंडल अध्यक्षांच्या अनुभवांवर आधारित चर्चा आणि प्रश्नोत्तर सत्र हे या भेटीचे ठळक वैशिष्ट्य ठरले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुसंवाद, संघटनशक्ती आणि जमीनीवरील कार्यकर्त्यांचे योगदान याला सलाम करत मंडल अध्यक्षांचे कौतुक केलं. भाजपमध्ये मोठ्या नेत्यांइतकाच मंडल कार्यकर्त्यालाही महत्व आहे हेच भाजपचे वेगळेपण आहे, असं त्यांनी ठामपणे सांगितले.
ही भेट केवळ फोटोसेशनपुरती मर्यादित न राहता, राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरली. संसद अधिवेशनाच्या काळात वेळ काढून पुण्यातील मंडल अध्यक्षांसोबत राष्ट्रीय नेत्यांनी दिलेला वेळ ही भाजप नेतृत्वाची कार्यकर्त्यांवरील बांधिलकी अधोरेखित करणारी बाब आहे.
खासदार मोहोळ यांनी स्पष्ट केले, महापालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना पक्ष संघटन बळकट करणं, कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणं आणि थेट संवादातून अचूक दिशा मिळवणं हेच या दौऱ्याचे प्रमुख उद्दिष्ट होते.
या दौऱ्यातून कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्याची भाजपची पारंपरिक कार्यपद्धती पुन्हा एकदा अधोरेखित झाली. याचे प्रत्यक्ष दृश्य संसदेत झळकले, जिथे राष्ट्रीय नेत्यांसमोर पुणे जिल्ह्यातील मंडल अध्यक्षांनी आपले मत, शंका आणि विचार निर्भीडपणे मांडले. यामुळे आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजप संघटना अधिक शिस्तबद्ध आणि सज्ज असल्याचं चित्र स्पष्ट दिसून येतं आहे.