शरद पवारांचा गव्हाणेंवर ‘डाव’ : अजितदादांना आव्हान, महेश लांडगेंना टेन्शन

शरद पवारांचा गव्हाणेंवर ‘डाव’ : अजितदादांना आव्हान, महेश लांडगेंना टेन्शन

पिंपरी-चिंचवड ही शहर म्हंटले की उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे प्राबल्य नाकारुन चालत नाही. या शहरांत अजितदादांची हवा, रुबाब, दरारा या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. हे शहरच मुळात अजितदादांनी लहान मुलासारखे वाढवले असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळेच त्यांच्या बंडानंतरही शहरातील अनेक पदाधिकारी आणि माजी नगरसेवक अजितदादांची साथ दिली होती. पण याच शहरात आता अजितदादांचा उतरता काळ सुरु झाला आहे. मागील काही दिवसांपासून शरद (Sharad Pawar) पवार यांनी अजितदादांच्या बालेकिल्ल्या मोठ्या प्रमाणात सुरुंग लावला आहे. यातील मोठा स्फोट झाला तो बुधवारी.

माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष असलेल्या अजित गव्हाणे, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष यश साने, शहर कार्याध्यक्ष राहुल भोसले आणि भोसरी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष पंकज भालेकर यांनी मंगळवारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला. त्यांच्यासह 25 माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP, Sharadchandra Pawar Party) पक्षात प्रवेश पार पडला. यापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी विशाल काळभोर, विशाल वाकडकर यांनीही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. (Former MLA Vilas Lande, NCP city president Ajit Gavane and many others joined Sharad Pawar’s party.)

आता विधानसभेचं ‘झाकणं’ उडवणार? विवेक कोल्हेंची पावलं शरद पवारांच्या दिशेने…

लोकसभा निवडणुकीनंतर अजितदादांच्या गटाला पिंपरी- चिंचवडमध्ये धक्के सोसावे लागत आहेत. याचे कारण म्हणजे आगामी विधानसभा निवडणूक. संपूर्ण महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर लागलीच पदाधिकाऱ्यांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये सर्वेक्षण करून घेतले. त्यात शरद पवार यांच्याबाबत अजूनही सहानुभूतीची लाट असल्याचे दिसून आले. त्याचीच परिणीती पक्ष प्रवेशात झाल्याचे दिसून येत आहे.

आता गव्हाणे यांना विधानसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अजित यांच्या माध्यमातून गव्हाणे कुटुंबीयांची तिसरी पिढी पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सक्रिय आहे. सुसंस्कृत, मितभाषी, उच्चशिक्षित व्यक्त्तिमत्व म्हणून ते परिचित आहेत. 2002 पासून चारवेळा ते महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत. 2007 मध्ये त्यांनी स्थायी समितीचे सभापतिपद सांभाळले होते. आता अजित गव्हाणे यांना भोसरीमधून विधानसभा निवडणूक लढवायची आहे. परंतु, ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला मतदारसंघ सुटणार असे महायुतीचे सूत्र ठरल्याचे सांगितले जाते. सध्या भोसरीत भाजपचे महेश लांडगे आमदार आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपलाच सुटण्याचे निश्चित मानले आहे.

अशा परिस्थितीमध्ये भोसरीतून गव्हाणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर होती. त्यामुळे गव्हाणे यांच्याकडून पक्ष प्रवेशाचे संकेत येताच शरद पवार गटाकडून ‘रेड कार्पेट अंथरण्यात आले. आता त्यांच्या माध्यमातून भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी नवा चेहरा मिळू शकतो, अशी गणिते शरद पवार गटाने बांधल्याचा अंदाज आहे. गव्हाणे यांच्यासोबतच माजी आमदार विलास लांडे यांनीही घरवापसी केली आहे. विलास पाटील हे मागील अनेक दिवसांपासून अजितदादांच्या गटात नाराज होते. 2019 मध्ये ते शिरुरमधून लोकसभेला इच्छुक होते. मात्र ऐनवेळी अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली. 2024 मध्येही शिवाजीराव आढळराव पाटील यांना पक्षात घेण्यास आणि उमेदवारी देण्यास लांडे यांचा विरोध होता. मात्र त्यांचा विरोध डावलून अजितदादांनी आढळराव पाटलांना उमेदवारी दिली.

राजकारणात इकडून तिकडे तिकडून इकडे चालणारच, शरद पवारांच्या भेटीनंतर छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य

आता विलास लांडे यांनीही शरद पवारांची साथ देण्याचे निश्चित केल्याचे दिसून येत आहे. लांडे यांनी मुलगा विक्रांतसाठी पवारांकडून शब्द घेतल्याचे बोलले जात आहे. तर विधानसभेसाठी ते गव्हाणे यांच्या मागे उभे राहण्याची शक्यता आहे. आम्ही विलास पाटील यांच्याच नेतृत्वात काम करत आहोत. त्यामुळे ते निश्चितपणे आमच्यासोबत आहेत, त्यांचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत, असे म्हणत गव्हाणे यांनीही याचे संकेत दिले. गव्हाणेंसोबत प्रवेश केलेल्या राहुल भोसले यांचेही मोठे राजकीय वजन आहे. वडील माजी महापौर हनुमंत भोसले यांच्या पावलावर पाऊल ठेवून पालिकेत नगरसेवक ते विरोधी पक्षनेता अशी मजल मारली आहे.

दरम्यान, गव्हाणे यांचा पक्षप्रवेश घडवून आणत पवारांनी उद्धव ठाकरेंनाही कॉर्नर केल्याचे बोलले जात आहे. कारण महाविकास आघाडीत भोसरी मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दावा केला होता. गव्हाणे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठीच हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube