आता विधानसभेचं ‘झाकणं’ उडवणार? विवेक कोल्हेंची पावलं शरद पवारांच्या दिशेने…
पुणे : विधान परिषद निवडणुकीत पराभव झालेले भाजपचे युवानेते विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांचे पुढचे राजकारण कसे असणार? या प्रश्नाचे उत्तर आता शरद पवार (Sharad Pawar) यांच्याजवळ थांबताना दिसून येत आहे. या प्रश्नाचे हेच उत्तर असल्यास शरद पवार यांना अहमदनगरच्या उत्तर भागाच्या राजकारणातही पुनरागमन करता येणार आहे. (BJP youth leader Vivek Kolhe may join Sharad Pawar)
नुकतंच गणेश सहकारी साखर कारखाना परिसरातील कोल्हे समर्थकांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यात त्यांना शिर्डीमधील शेतकरी मेळाव्याचे निमंत्रण दिले होते. आता हे निमंत्रण पवार यांनी स्वीकारले असून ते उपस्थितही राहणार आहेत. याच घडामोडीतून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विवेक कोल्हे हेही शरद पवार यांच्यासोबत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नेमके काय आहे हे राजकारण आणि कोल्हे यांच्यामुळे ते कसे बदलू शकते हेच आपण पाहू.
विवेक कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार का? गेले तर का जाणार? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला आधी कोपरगावचे राजकारण आणि यात विवेक कोल्हे यांचे कसे महत्व आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे.
कोपरगावचे राजकारण हे मागील अनेक वर्षांपासून कोल्हे विरुद्ध काळे या दोन कुटुंबियांभोवती फिरते. दिवंगत शंकरराव कोल्हे यांचे संपूर्ण राजकारण शरद पवार यांच्यासोबतच घडले.ते 35 वर्ष आमदार आणि तीनवेळा मंत्रीही राहिले होते. तर दिवंगत शंकरराव काळे हेही काँग्रेसचे नेते होते. 1991 मध्ये ते कोपरगाव मतदारसंघातून खासदार झाले. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र अशोकराव काळे काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. 1999 मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर शंकरराव कोल्हे यांनी पवारांसोबतच राहणे पसंत केले. त्यामुळे 1999 मध्ये शंकरराव कोल्हे यांनी राष्ट्रवादीतून तर अशोकराव काळे यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढवली. यात कोल्हे यांची सरशी झाली.
अजितदादांना घरात स्थान पण पक्षात घ्यायचे की नाही हे कार्यकर्ते ठरवतील… : पवारांचे सूचक विधान
2004 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र निवडणूक लढवली. त्यामुळे अशोकराव काळे यांनी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. 2004 आणि 2009 या दोन्हीवेळी अशोकराव काळे हे मोठ्या मताधिक्याने आमदार झाले. शंकरराव कोल्हे यांचे पुत्र बिपिन कोल्हे यांचा दोन्हीवेळी पराभव झाला. सलग दोनवेळा झालेल्या पराभवाने कोल्हे कुटुंबियांची ताकद कुठेतरी कमी होत होती. यातूनच सावरण्यासाठी 2014 मध्ये कोल्हे यांनी भाजपची वाट धरली. त्यानंतर शंकरराव कोल्हे यांनी मुलाऐवजी सुनबाई स्नेहलता कोल्हे यांना उमेदवारी दिली. तर अशोक काळे यांच्या निवृत्तीनंतर त्यांचे पुत्र आशुतोष काळे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली. सुनेला उमेदवारी देण्याचे खेळी यशस्वी झाली आणि तब्बल दहा वर्षांनी आमदारकी कोल्हेंच्या घरी आली. काळे यांचा 20 हजार मतांनी पराभव झाला.
हे राजकारण एका बाजूला सुरु असतानाच 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नगरच्या राजकारणात उलथापालथ झाली. राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आणि तिथूनच विखे पाटील विरुद्ध कोल्हे या कुटुंबातील संघर्षालाही सुरुवात झाली. 2019 मध्ये विधानसभेला स्नेहलता कोल्हे यांचा अवघ्या 845 मतांनी पराभव झाला होता. याला विखे पाटील जबाबदार असल्याचा आरोप कोल्हे समर्थकांनी केला. राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे आणि जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी कोपरगावमध्ये बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यात त्यांना 15 हजार 382 मते मिळाली तर कोल्हे यांचा 845 मतांनी पराभव झाला. परजणे यांना विखेंनीच छुपी मदत केल्याचा आरोप आजही कोल्हेंचे समर्थक करतात.
मी भेटल्याशिवाय जाणारच नाही; छगन भुजबळांच्या भेटीवर शरद पवार काय म्हणाले?
तिथून विखे पाटील यांचा बदला घ्यायचाच या इर्षेने स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे मैदानात उतरले. भाजपमध्ये असतानाही त्यांनी ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या तत्वाप्रमाणे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी हातमिळवणी केली. दोघांनी मिळून विखेंकडे असलेला गणेश कारखाना ताब्यात घेता. लोकांनी विखे यांच्या दहशतीचं झाकण उडवलं, असं म्हणत त्यांनी गुलाल उधळला. त्यातून विखे-कोल्हे वाद आणखीच विकोपाला गेला. याच निवडणुकीवेळी काळे आणि विखे यांचीही जवळीक वाढली. नगरच्या राजकारणात अत्यंत विचित्र युती-आघाडी तयार झाली.
आता महायुती झाल्यानंतर राज्यातील इतर मतदारसंघाप्रमाणेच कोपरगावमध्येही तेढ निर्माण झाला आहे. इथले विद्यामान आमदार आशुतोष काळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत आहेत. तर पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले कोल्हे कुटुंबिय भाजपमध्ये आहे. समीकरणांमुळे कोपरगावमध्ये महायुतीचे उमेदवार विवेक कोल्हे असणार आशुतोष काळे हा प्रश्न आहे. तेढ सोडविण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनीही प्रयत्न केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीने विवेक कोल्हे यांनी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात नशिब अजमावण्याचा प्रयत्न केला. विखे गट वगळून अन्य भाजप नेते कोल्हे यांच्या पाठीशी होते. मात्र विवेक कोल्हे यांचा पराभव झाला.
आता विधानसभेलाही विखे पाटील हे आपली ताकद आशुतोष काळेंच्या मागे उभी करतील यात शंकाच नाही. त्यामुळे विवेक कोल्हे यांना भाजपमध्ये संधी दिसत नाही. याच सगळ्या गणितामुळे विवेक कोल्हे यांनी शरद पवार गटाची वाट पकडण्याचा विचार केल्याचे दिसून येत आहे. आता विवेक कोल्हे नेमके काय करणार, ते खरंच शरद पवार यांच्यासोबत जाणार का? विधानसभेचं झाकण उडवणार का? की भाजपमध्येच थांबणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसतरी नगरचे राजकारण इंट्रेस्टिंग असणार आहे हे नक्की.