Thane Hopsital News : ‘घटनेच्या मुळाशी जाणार, जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करणार’; आरोग्यमंत्र्यांची घोषणा

Thane Hopsital News : ‘घटनेच्या मुळाशी जाणार, जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करणार’; आरोग्यमंत्र्यांची घोषणा

Kalwa Hospital : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital) गुरूवारी दिवसभरात उपचाराअभावी सहा रुग्णांचा मृत्यू झाला होता. या घटनेला २ दिवस होत नाहीत, तोच गेल्या १२ तासात रुग्णालयात आणखी १७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. यामुळे रुग्णालय प्रशासन पुन्हा टीकेचे धनी ठरलं आहे. मुख्यमंत्र्याच्या ठाणे जिल्ह्यात हे काय चाललं आहे, असा प्रश्न विरोधक विचारत आहे. दरम्यान, यावर आता आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या मृत्यूंना जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करणार असा इशारा त्यांनी दिला. (Health Minister Tanaji Sawants reaction to death in Kalwa Hospital)

कळव्यामधील रुग्णांच्या मृत्यूच्या विषण्ण करणाऱ्या घटनेवर बोलतांना तानाजी सावंत म्हणाले की, कळवा येथील रुग्णालयात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेची माहिती आम्ही घेत आहोत. मी सर्वांच्या संपर्कात आहे. ठाणे आयुक्त, आरोग्य अधिकारी यांच्याकडून या प्रकरणाची माहिती घेत आहोत.१७ रुग्णांपैकी १३ आय सी यू मध्ये मृत्यू आहेत तर इतर ४ हे जनरल वार्ड मधील आहेत. यापूर्वी ज्या रुग्णांचा मृत्यू झाला होता,त्यांचीही माहिती घेत आहोत. या ठिकाणी काय घडले याची माहिती घेतली जात आहे. रुग्णांकडे दुर्लक्ष झाले आहे का? ही बाबही अहवाल आल्यावर स्पष्ट होईल.

शरद पवार-अजितदादांच्या भेटीवर फडणवीसांचे कानावर हात; म्हणाले, मला जर..

सावंत म्हणाले, हे रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येते. पण मृत्यू हा मृत्यूच असतो. पुरोगामी महाराष्ट्रात घडणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या घटना माझ्यासारखा मंत्री मुळीच सहन करणार नाही, असं त्यांनी सांगिलतं

मुख्यमंत्री शिंदे यांच्या शहरात रुग्णांचा मृत्यू होत आहे. सरकार अपयशी ठरत आहे. यावर विचारले असता सावंत म्हणाले की, घटना मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात किंवा गडचिरोली किंवा चंद्रपूरमध्ये घडली, यात पडू नका. सर्व महाराष्ट्राचे नागरिक आहेत. ती सरकारची जबाबदारी आहे. सरकार म्हणून आम्ही जबाबदारी घेतली आहे. आम्ही या घटनेच्या मुळाशी जाणार आहोत. या रुग्णांच्या मृत्यूच्या कारणाचा अहवाल एक-दोन दिवसांत येईल. अहवाल प्राप्त झाल्यानंतर हे कृत्य करणाऱ्यांवर, या घटनेला जबाबदार असलेल्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार कडक कारवाई करणार असं सावंत यांनी सांगितलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube