बाकी पक्षांचे पदाधिकारी झोपलेले असताना एकट्या धंगेकरांनी ‘यंत्रणेला’ घाम फोडलाय…

बाकी पक्षांचे पदाधिकारी झोपलेले असताना एकट्या धंगेकरांनी ‘यंत्रणेला’ घाम फोडलाय…

Who is धंगेकर? कसबा पोटनिवडणुकीच्यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी हा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर मागच्या दीड वर्षांपासून भाजपला सतत वेगवेगळ्या टप्प्यांवर मिळत आहे. ललित पाटील प्रकरण असो की सध्या गाजत असलेले कल्याणीनगर भागातील अपघात (Kalyani Nagar Accident) प्रकरण असो. या दोन्ही प्रकरणात काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपसह संपूर्ण यंत्रणेला अक्षरशः घाम फोडला. या दोन्ही प्रकरणात पोलिसांच्या अकार्यक्षमेतवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. जनभावना पोलिसांच्या विरोधात गेली. जनता संतप्त होती. याच जन भावनेला साद घातली ती आमदार रवींद्र धंगेकर यांनी. (In the Kalyaninagar accident case, Ravindra Dhangekar has broken the system from day one.)

तसे बघितले तर जे सत्ताधारी तिन्ही पक्ष आहेत, त्यांच्याकडून तर आंदोलनाची अपेक्षा नव्हतीच. पण पुण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या पक्षांचे विरोधी पक्ष म्हणून अस्तित्व आहे. यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आंदोनलं केली. पण त्यांचा फारसा प्रभाव पडला नाही. सुषमा अंधारेंनी आठवड्याभरानंतर आंदोलनात सहभाग घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाच्या एकाही पदाधिकाऱ्याने तेवढी देखील तसदी घेतली नाही. या प्रकरणात अजित पवार यांच्या अगदी जवळच्या आमदाराचा थेट संबंध दिसत असतानाही शरद पवारांच्या पक्षातील पदाधिकारी मूग गिळून गप्प राहिले. पण धंगेकरांनी अगदी पहिल्या दिवसापासून विरोधी आमदार म्हणून हे प्रकरण धसास लावण्याचा प्रयत्न केला. प्रशासकीय यंत्रणांना सातत्याने धारेवर धरले.

रवींद्र धंगेकर यांनी काय केले?

पुण्याच्या कल्याणीनगर भागात आठवड्याभरापूर्वी गंभीर अपघात झाला. यात दोन निष्पापांचा बळी गेला. त्यानंतर या प्रकरणात सुरुवातीलाच स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांची एन्ट्री झाली. पुणे पोलिसांकडून आरोपीला मिळालेली व्हिआयपी ट्रिटमेंट, त्याला अवघ्या 14 तासांत मिळालेला जामीन, आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये झालेले बदल या सगळ्या गोष्टीनी पुण्याचं राजकीय आणि सामाजिक वर्तुळ ढवळून निघाले. वाहतुकीच्या नियमांचाही उहापोह झाला. याच अपघातानंतर पब आणि बारचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. या सगळ्यामुळे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, येरवड्याचे पोलीस निरीक्षक या सगळ्यांपर्यंत सगळ्यांचीच प्रतिमा मलिन झाली.

Video : विधानसभेतही खटपट होणारच; भुजबळांच्या मागणीवर फडणवीसांनी दिलं उत्तर

या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली ती म्हणजे पैशांच्या जोरावर संबंधित मुलाचा ब्लड रिपोर्टच बदलल्याची. ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल कचऱ्यात फेकले. त्याच्या जागी दुसऱ्याच कोणाच्या तरी ब्लड सॅम्पलचे टेस्ट करुन लॅब रिपोर्ट बनवला, स्वतः पोलीस आयुक्तांनीच याबाबत माहिती दिल्याने खळबळ उडाली. सध्या या दोन डॉक्टरांना, तिथल्या शिपायाला अटक केली आहे. याशिवाय यापूर्वी या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल, त्याचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना अटक केली आहे. येरवडा पोलीस स्थानकातील दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. या सर्व गोष्टी जनभावनेने शक्य करुन आणल्याचे दिसून येते.

प्रकरण तापल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात येऊन गेले. पण संबंधित मुलाला व्हिआयपी ट्रिटमेंट देणाऱ्या पोलिसांवरील कारवाईबाबत त्यांनी कसलीही घोषणा केली नाही. केवळ चौकशी केली जाईल असे सांगितले. पण चार दिवस उलटल्यानंतरही कोणती कारवाई झाली नव्हती. धंगेकर यांनी अगदी दुसऱ्याच दिवशीपासून रस्त्यावर उतरुन आंदोलनाला सुरुवात केली. सोमवारी 20 मे रोजी म्हणजे धंगेकर यांच्या नेतृत्वात येरवडा पोलीस स्टेशनसमोर काँग्रेसकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले. यात त्यांनी बारची आणि पबची नावे घेतली. येरवडा पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे याची मागणी केली. इतकेच नाही तर त्यांनी आयुक्तांनाच हटवावे अशीही मागणी केली.

गृहमंत्री असलेले गोपीनाथ मुंडे पुण्यात आले अन् थेट ‘पबवरच’ रेड टाकली…

सोशल मिडीयावरील हवा दोन दिवसात विरली असती. पण धंगेकर यांनी या प्रकरणात रस्त्यावर उतरुन घेतलेली भूमिका निश्चितच कौतुकास्पद आहे. आयुक्त अमितेश कुमार यांना प्रेसपुढे येऊन तपास आणि कारवाई यांची रोज माहिती द्यावी लागली. जनभावना, सोशल मिडीयावरील नॅरेटिव्ह आणि धंगेकर यांनी लावून धरलेले आंदोलन यामुळे पोलिसांना अखेर येरवडा पोलिसांवर कारवाई करावी लागली. यानंतर धंगेकरांनी आपला मोर्चा भ्रष्ट महानगरपालिका प्रशासनकडे वळवला. लागलीच अनधिकृत पब आणि बार तोडायला सुरुवात झाली.

आज धंगेकरांनी राज्य उत्पादन शुल्क खात्यात होणारी हप्ते वसुली आणि वसुली कर्मचारी यांची यादीच अधिकाऱ्यांपुढे वाचून दाखवली. त्यांना तोंडावर झापत अक्षरशः घाम फोडला. यावेळी अधिकाऱ्यांचा चेहराही काहीसा लाजेने लाल झाला होता. काही महिन्यांपूर्वी ड्रग्ज तस्कर ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला होता. त्यानंतरही धंगेकर यांचा हाच रुद्रावतार पाहायला मिळाला होता. त्यांनी अशीच पुण्याला खडबडून जागं करणारी आंदोलनं केली होती. एकूणच काय तर “कोण धंगेकर? मी ओळखत नाही”, “Who is धंगेकर” असं मंत्री कितीही म्हणाले, तरी याच धंगेकरांनी सध्या भाजपसह सबंध यंत्रणेला घाम फोडलाय हे नक्की.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube