Kunal Tilak : ब्राह्मण नाराज आहे की नाही 2 तारखेला कळेलच !
कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा ( Kasaba byelection ) प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. भाजपकडून आज पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar ) यांच्या नेतृत्वात प्रचार फेरीच आयोजन करण्यात आले होते. भाजपने या पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणूक प्रचारात आता कसबा विधानसभेच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक ( Kunal Tilak ) हे उतरले आहेत.
ओंकारेश्वर येथे आरती करुन त्यांनी आज प्रचाराचा शुभारंभ केला. दु:खातून सावरण्यासाठी आम्ही पक्षाकडे वेळ मागितला होता. आता मात्र आम्ही पुर्णपणे प्रचारात उतरलो आहोत, असे कुणाल टिळक म्हणाले. तसेच ब्राह्मण समाज कोणत्याही कारणाने नाराज नसून निकालाच्या दिवशी भाजपचा उमेदवार विक्रमी मतांनी विजयी होईल, असा विश्वास कुणाल टिळक यांनी व्यक्त केला.
दरम्यान कसब्याच्या जागेसाठी भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने टिळक कुटुंब नाराज असल्याचे बोलले जात होते. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी देखील पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. तसेच कुणाल टिळक यांची देखील उमेदवार म्हणून चर्चा होती. पण भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. टिळक परिवाराच्या नाराजीच्या चर्चेनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टिळक कुटूंबाची भेट घेतली होती. यानंतर माध्यमांसमोर बोलताना शैलेश टिळक व कुणाल टिळक यांनी आपण पक्षासोबत असल्याचे सांगितले होते. यादरम्यान भाजपने कुणाल टिळक यांची प्रदेश प्रवक्तेपदी निवड केली आहे.
कसबा पोटनिवडणुकीमध्ये कांग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडून नाना पटोलेत, विश्वजीत कदम ही नेतेमंडळी देखील प्रचारात सहभागी झाली आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.