शिरूर लोकसभेसाठी शरद पवारांच्या मनात 2 नावे! अमोल कोल्हे आणि….

शिरूर लोकसभेसाठी शरद पवारांच्या मनात 2 नावे! अमोल कोल्हे आणि….

विष्णू सानप :

पुणे : अवघ्या एका वर्षावर येऊन ठेपल्या लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आली आहे. मतदारसंघाचा आढावा, पक्षाची ताकद वाढविण्यासाठीच्या उपाययोजना, उमेदवारांची चाचपणी, जागावाटप अशा टप्प्यांवर तयारी सुरु आहे. याच तयारीचा एक भाग म्हणून मुंबईत काल आणि आज (३० मे) राष्ट्रवादीची लोकसभा मतदारसंघ आढावा बैठक पार पडत आहे. या बैठकीत प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात येत आहे. (Lok Sabha Election 2024 Shirur Lok Sabha constituency NCP candidate Amol Kholhe or Dilip Walse Patil)

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. यापैकी शिरुर लोकसभा मतदारसंघाची चर्चा आज होणार नाही. मात्र शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून संभाव्य उमेदवार म्हणून डॉ. अमोल कोल्हे आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ही 2 नावेच आल्याची माहिती राष्ट्रवादीतील ज्येष्ठांकडून मिळाली आहेत. याआधीही वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी यासाठी राष्ट्रवादीकडून आग्रह धरण्यात आला होता. मात्र, त्यांनी त्यावेळेस लढवली नव्हती. परंतु 2024 च्या लोकसभेला शिरूरमधून निवडणूक लढवावी, असा आग्रह केला जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

2024 ला लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न केला जात असून त्यासाठी त्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. यामुळेच धनंजय मुंडे, छगन भुजबळ तसेच अनेक ज्येष्ठ नेत्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची रणनीती आखण्यात येत असल्याचे समजते, याचाच भाग म्हणून दिलीप वळसे पाटील यांचेही नाव पुढे आलं आहे.

वळसे पाटील यांची शरद पवार यांच्या अत्यंत विश्वासू सहकार्यांपैकी एक आहेत. शिवाय ते याच मतदारसंघातील अर्थात आंबेगावचे असल्याने त्यांच्या नावावर एकमत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाबाबत काय रणनीती आखतात आणि कुणाला शिरूरमधून उमेदवारी दिली जाईल, हे आत्ताच सांगता येणार नाही. मात्र, सध्या तरी अमोल कोल्हे यांच्या पाठोपाठ वळसे पाटलांच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे.

दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघात अलीकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशीच लढत पाहायला मिळाली. शिवसेनेकडून शिवाजी आढळराव पाटील यांनी तीन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. तर, त्यांना 2019 च्या निवडणुकीत कोल्हेंकडून पराभव स्वीकारावं लागला होता. मात्र त्यानंतर राजकीय परिस्थितीमध्ये मोठा बदल झाला आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना असा सामना होणार आहे. अशात उद्धव ठाकरे यांना शिरुरची जागा जागा राष्ट्रवादीला सोडावी लागू शकते, यामुळे आढळराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशही केला आहे. परंतु या मतदारसंघात भाजपकडून ताकद लावली जात असल्याने नेमकी ही जागा शिंदे यांच्या शिवसेनेला सुटते की भाजप स्वतःच लढवते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, अमोल कोल्हे हे शिरूर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार असतील अशाही चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहेत. त्यामुळे आगामी काळात या ठिकाणी काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube