पश्चिम महाराष्ट्रात आज राजकीय धुराळा; शक्तीप्रदर्शन अन् दिग्गजांच्या हजेरीत उमेदवार भरणार अर्ज
Maharashtra Lok Sabha Election : राज्याच्या राजकारणात आजचा दिवस मोठ्या घडामोडींनी (Maharashtra Lok Sabha Election) गाजणार आहे. त्यातही पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. सातारा, सांगली, बारामती या प्रतिष्ठेच्या मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचं जोरदार शक्तीप्रदर्शन पहायला मिळणार आहे. या मतदारसंघांत आज उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या उमेदवारांचे अर्ज दाखल करतेवेळी मंत्री अन् पक्षांचे मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे रॅली अन् हजारोंच्या गर्दीत राजकीय धुराळा उडणार आहे. आज बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते उपस्थित राहणार आहेत.
Loksabha Election: लोकसभा निवडणूकीबद्दल अभिनेत्याने दिली महत्वाची माहिती, म्हणाला…
शिरुर मतदारसंघात हायहोल्टेज लढत होत आहे. अजित पवार गटाकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील मैदानात आहेत. या निवडणुकीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे तसेच पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करणार आहेत.
यानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, खासदार संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीतील मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. या नेत्यांच्या उपस्थितीत मोठे शक्तीप्रदर्शन होणार आहे.
महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. यानंतर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या माध्यमातून महायुती सुद्धा शक्तीप्रदर्शन करणार आहे. सातारा लोकसभेसाठी तिकीट मिळाल्यानंतर आज उदयनराजे सकाळी 10 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
रायगड लोकसभा मतदारसंघात हायहोल्टेज लढत होत आहे. येथे महाविकास आघाडीने माजी खासदार अनंत गीते यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे पुन्हा मैदानात आहेत. आज तटकरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तटकरे यांच्या उमेदवारीला शिवसेना आणि भाजपातील स्थानिक नेत्यांनी मोठा विरोध केला होता. परंतु हा विरोध शांत करण्यात मुख्यमंत्री शिंदे आणि तटकरेंना यश आले आहे.